उस्मानाबाद : यंत्रणेला सातबारा नावावर करुन देता येत नाही, म्हणून सहा वर्षांपूर्वी शस्त्र परवान्याची मागणी करणार्‍या वृद्ध शेतकर्‍याने उस्मानाबादमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला. महसूल प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे हतबल झालेल्या शेतकर्‍याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच गळफास घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता.


सातत्याने सातबारा दुरुस्तीसाठी पाठपुरावा करुनही पदरी निराशा आल्याने माणिक मोराळे यांनी चक्क हातात दोरी घेऊन झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ऐनवेळी सतर्कता दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मोराळे यांचा गेली 75 वर्ष सातबारावरील नाव बदलण्यासाठी लढा सुरु आहे. वाशी तालुक्यातील वडजी गावातील माणिक मोराळे त्यांच्या दत्तक गेलेल्या वडिलांच्या जमिनीवर नावे बदलली कशी, याचा शोध घेत होते.

मोराळेंनी कागदपत्रे जमा केली होती. तब्बल 17 फौजदार आणि दिवाणी प्रकरणात न्यायालयात लढा दिला. 23 सप्टेंबर 2011 रोजी शेवटचा निकाल पदरात पाडून घेतला, पण सातबाऱ्यावरचे नाव काही बदलले नाही.

यंत्रणा नाव बदलतच नाही, हे लक्षात आल्यानंतर वृद्धावस्थेत आलेल्या माणिक मोराळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज केला. ‘सातबाऱ्यावरील नाव बदलून देता येत नसेल तर किमान शस्त्रपरवाना तरी द्या’, अशी विनंतीही धूळखात पडून आहे.

मोराळे नित्यनेमाने न्यायालयात खेटे घालत आता जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत, एका सातबाऱ्याच्या नोंदीसाठी ही वणवण. मोराळे यांच्या दोन पिढया मातीत गेल्या.

तालुका कोर्टापासून उच्च न्यायालयापर्यंत सगळीकडे निकाल बाजूने लागला, मात्र महसूल प्रशासनाने ताकास तूर लागू दिला नाही. 1942 पासून सुरु असणारा मोराळे यांचा लढा आता अधिकारी, घरातील सदस्य, पाहुणेरावळे यांच्या थट्टेचा विषय बनला आहे.