कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेत रस्ते हस्तांतरणाचा ठरावं मंजूर केला, तर महापौरांना काळं फासू, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला. त्या कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होत्या.
एकीकडे भूमाता ब्रिगेड राज्यभर दारु मुक्तीसाठी प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडं कोल्हापुरात दारु दुकान बंद असताना ती सुरु करण्यासाठी कोल्हापूर महापालिका झटत आहे. त्यामुळं कोल्हापूरचे रस्ते हस्तांतरण केल्यास महापौर हसिना फरास यांना काळे फासू असा इशारा देसाई यांनी दिला आहे.
दारु दुकानांसाठी रस्ते हस्तांतरण करण्याला विरोध होत आहे.
महापालिकेत गोंधळ
दरम्यान, रस्ते हस्तांतरणाचा विषयावरुन महापालिका सभेत गोंधळ पाहायला मिळाला.
भाजपाचे नगरसेवक कमलाकर भोपळे आणि काँग्रेसचे नगरसेवक शारंगधर देशमुख हे एकमेकांच्या अंगावर धावून गेले.
या प्रकारामुळे महापौरांनी अर्धा तास सभा तहकूब केली. तसंच महापौर हसीना फरास सभेतून उठून गेल्या.
पुजारी हटाव आंदोलनात सहभागी
दरम्यान आंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव आंदोलनात भूमाता ब्रिगेड सहभागी होणार असल्याची माहिती, तृप्ती देसाई यांनी यावेळी दिली.
त्यामुळे आता श्री पूजक आणि हिंदुत्ववादी यांच्यात सुरू असलेल्या वादात भूमाता ब्रिगेडनेही उडी घेतली.