Opposition Parties Meeting: आगामी लोकसभा (Loksabha Eelection 2024) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची (Opposition Party Meeting) तिसरी बैठक मुंबईत (Mumbai) होणार आहे. या बैठकीत 11 सदस्यांची सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. बंगळुरुमध्ये पार पडलेल्या विरोधकांच्या दुसऱ्या बैठकीत ही निर्णय घेण्यात आला आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपविरोधात रणनिती आखण्यासाठी विरोधकांकडून बैठकांच सत्र सुरु आहे. आधी पाटणा आणि आता बंगळुरुमध्ये विरोधकांची एकजूट पाहायला मिळाली. हीच एकजूट आता मुंबईत देखील पाहायला मिळणार आहे.
मल्लिकार्जुन खरगेंचा एनडीएच्या बैठकीवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांना घाबरत असल्याचं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. भाजप सरकार लोकशाही आणि संविधानाला संपवण्याचा प्रयत्न करकत आहेत. ते विरोधी पक्षांच्या विरोधात प्रशासकीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा दावा देखील काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.
एनडीएच्या बैठकीवर विरोधकांचा निशाणा
मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं की, 'एनडीए 30 राजकीय पक्षांसोबत बैठक करत आहे. भारतात इतके राजकीय पक्ष आहेत हे मला माहित देखील नाही. आधी त्यांनी कोणतीही बैठक घेतली नाही आणि आता ते एक - एक करुन बैठका घेत आहेत. आम्ही लोकशाही आणि संविधानाला वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत.'
मुंबईतील बैठकीकडे आता सर्वाचं लक्ष
विरोधकांची पहिली बैठक ते दुसरी बैठक यादरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर खळबळ माजली. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचा पक्ष फुटला आणि महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसला आहे. अजित पवार सत्ताधारी पक्षात सामील झाले आणि राष्ट्रवादीचं संख्याबळ कमी झालं. तसेच राज्यात सुरु असलेल्या राजकीय खळबळींमुळे विरोधकांसाठी आणि राज्यासाठी महत्त्वाची असणार आहे. आता मुंबईत होणारी ही बैठक महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने देखील महत्त्वाची मानली जात आहे. यावर आता सत्ताधारी पक्ष कोणती भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
विरोधी पक्षांचं नाव INDIA
विरोधी पक्षांच्या या एकजूटीला इंडिया असं नाव देण्यात आलं आहे. यासाठी अनेक नावांचा विचार करण्यात आला होता. पण त्यानंतर एकमताने INDIA या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षांच्या या एकजूटीवर सत्ताधारी पक्ष काय प्रतिक्रिया देणार हे देखील पाहणं गरजेचं आहे.