नागपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरू केलेल्या दूध आंदोलनाचे पडसाद पावसाळी अधिवेशनात पडताना दिसत आहेत. सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दुध डेअरी आणि पतंजलीचे दुध येण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.


सरकारच्या आडमुठेपणामुळे आणि चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर ही वेळ आल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. "एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना शेतातील कामे करण्याऐवजी शेतकऱ्यांवर भरपावसात रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणली आहे. प्रत्येकवेळी रस्त्यावर उतरल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय द्यायचाच नाही, असे सरकारने धोरण ठरवले आहे काय? " असा प्रश्न धनंयज मुंडे यांनी उपस्थित केला.


सरकारने 26 जून 2017 रोजी गाईच्या दुधाला 27 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 36 रुपये भाव जाहीर केला होता. मात्र, शेतकऱ्यांना केवळ 17 रूपये भाव मिळत आहे. त्यामुळे वर्षभरापासून शेतकरी लीटरमागे 10 रुपयांची खोट खात असल्याची आठवण यावेळी धनंजय मुंडे यांनी सरकारला करुन दिली. आंदोलन केल्यानंतरही सरकार केवळ मलमपट्टी करण्याचे धोरण अवलंबित आहे. केवळ घोषणांमुळे दुध उत्पादकांचे पोट भरणार नाही, असं मुंडे यांनी सांगितलं.


राज्य सरकारने दूध भुकटीला किलोमागे जाहीर केलेलं पन्नास रुपयांचं अनुदान पुरेसं नसून हे अनुदान दुप्पट करावं. तसेच दुधासाठी प्रतिलीटर पाच रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करावेत, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी यावेळी केली. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांप्रती सरकार असंवेदनशील असून सरकारच्या धोरणांमुळे दुधाचा धंदा मोडकळीस आला असल्याचा आरोपही त्यांनी केला.


दुग्धविकास राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचाही समाचार धनंजय मुंडे यांनी घेतला. सदाभाऊ खोत यांच्या शेतकरी दुधात पाणी टाकतात, या वक्तव्यावर मुंडे यांनी आक्षेप घेतला. सरकारला शेतकऱ्यांचे दु:ख, वेदना समजत नाहीत, दुधातले पाणी कसे दिसते? असा टोला त्यांची लगावला.


महादेव जानकर यांना एका दूध उत्पादक शेतकऱ्याने दुधाचा भाव विचारण्यासाठी फोन केला होता. त्यानंतर त्या शेतकऱ्याच्या 55 वर्षाच्या वडिलांना जेलमध्ये टाकण्याचा, चौकशी करण्याच्या कृतीचाही त्यांनी समाचार घेतला. शेतकऱ्यांनी तुम्हाला जाबही विचारायचा नाही का, असा प्रश्नही धनंजय मुंडे यांनी जानकरांना विचारला.