रत्नागिरी : राज्य सरकारने काढलेला नवा मच्छीमारी कायदा हा मच्छीमारांसाठी मारक आहे. या विरोधात रत्नागिरी जिल्ह्यातील पर्ससिन मच्छिमारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मिरकरवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात चार ते पाच हजार मच्छीमार सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा येताच हजारो मच्छीमारांनी 'समुद्र आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा...', 'हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा', अशा घोषण देऊन परिसर दणाणून सोडला.


संपूर्ण जिल्ह्यातून मच्छीमार, नौका मालक आणि या मासेमारीवर अवलंबून असलेले उद्योजक, व्यावसायिक या मोर्चात सहभागी झाले आहेत. नव्याने गठीत झालेल्या समितीने केवळ पर्ससीन नेट मासेमारीला लक्ष्य करु नये. इतरही जाळ्यांद्वारे होणार्‍या मासेमारीचा विचार केला जावा, या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित काढला आहे.


आम्हाला आकारला जात असलेला दंड, केवळ चारच महिने मच्छीमारीला असलेली परवानगी शिवाय मच्छीमारी करण्यासाठी असलेले बंधन हे नवीन कायद्यातील नियम मच्छीमारांसाठी मारक आहेत. त्याबाबत सरकारने फेरविचार करावा. अन्यथा आगामी काळात थेट मुंबईत मंत्रालयावर धडकू असा थेट इशारा मच्छीमारांनी दिला आहे.


राज्य सरकारच्या कायद्यात एलईडी आणि पर्ससिन नेटमार्फत होणाऱ्या अवैध मासेमारीविरोधात कठोर कारवाईची तरतूद आहे. पर्ससिन मच्छीमारांनी या कायद्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. "राज्य सरकारने एकच कॅटेगरीला टार्गेट करुन कायदा काढला आहे. इतर मासेमारी जाळ्यांनी होणार्‍या मासेमारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. कायद्यानुसार आमच्यावर जे निर्बंध लावले आहेत, त्याबाबत निवेदन देऊन, साखळी उपोषण करुनही दखल न घेतल्याने आम्ही भव्य मोर्चा काढला आहे," अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे.


अस्लम शेख यांनी आमच्यासाठी काही केलेलं नाही, त्यांनी राजीनामा द्यावा : आंदोलक


"आमच्या मागणी तातडीने पूर्ण व्हायला हव्या आहेत, अन्यथा आम्ही आणखी भव्य मोर्चा काढू. सरकारविरोधात, अस्लम शेखविरोधात मोर्चा काढणार. अस्लम शेख यांनी आमच्यासाठी काहीही केलेलं नाही. त्यांना केवळ त्यांच्या वोटबँकेची चिंता आहे. अस्लम शेख यांनी राजीनामा द्यावा," अशी उद्विग्न प्रतिक्रिया मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलक मच्छीमाराने दिली.