गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध गावाला नवी ओळख मिळाली आहे. आता हे गाव 'पुस्तकाचे गाव' म्हणून ओळखले जाणार आहे. 'हाय ऑन वाय' या वेल्स (इंग्लंड) मधील पुस्तकाच्या गावाच्या धर्तीवर भिलार (महाबळलेश्वर) इथे दोन वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या 'पुस्तकांचे गाव' या उपक्रमाला योजनेचा दर्जा देण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान, नवेगाव-नागझिरा वाघ्र संरक्षण प्रकल्पामुळे राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातीप्राप्त नवेगावबांध आता 'पुस्तकाचे गाव' म्हणून ओळखले जाणार आहे. राज्य सरकारच्या पुस्तकाचे गाव योजनेत नवेगावबांधची नागपूर विभागातून निवड करण्यात आली करण्यात आली आहे.


वाचन चळवळ वाढावी, मराठी भाषेतील नवे जुने लेखक, संत साहित्य, कादंबरी, ललित, चरित्र आत्मचरित्र, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य यांच्या फुललेल्या आणि बहारलेल्या विश्वात वाचनाचा आनंद घेता यावा यासाठी राज्य सरकार हा प्रकल्प राबवते. 'पुस्तकाचे गाव' या योजनेची व्यापकता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात एक 'पुस्तकाचे गाव' योजना सुरु करुन योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. या निर्णयानुसार राज्यातील 'पुस्तकाचे गावे' विस्तारीत स्वरुपात सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात नागपूर विभागातून गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांधचा समावेश करण्यात आला आहे.


तर आता संयुक्त वनव्यवस्थापन समिती, ग्राम पंचायत, नवेगावबांध फाऊंडेशन या संस्थानांद्वारे ही योजना गावात राबवण्यात येणार आहे. नवेगावबांधचा पुस्तकाचे गाव योजनेत समावेश झाल्याने पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांना विविध 2000 पुस्तके वाचनाची मेजवानी मिळणार आहे. तसेच गावकरी, विद्यार्थ्यांसह युवकांना देखील बहुरंगी पुस्तके वाचनाची संधी मिळणार आहे. त्यामुळे आता आपले गाव हे 'पुस्तकाचे गाव' म्हणून ओळखले जाणार म्हणून गावकरी आनंद व्यक्त करत आहेत.


'पुस्तकाचे गाव' या योजनेमुळे नक्कीच गोंदियासारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात वाचन संस्कृती रुजून संगणक, इंटरनेटच्या युगात तरुण नक्कीच पुस्तकाकडे वळतील यात दुमत नाही.