मुंबई : राज्याच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. त्यात बहुमत चाचणीअगोदर विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाते. यात आपला अध्यक्ष निवडून यावा यासाठी भाजपने दोन मिशन हाती घेतल्याची सुत्रांची माहिती आहे. अध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आपल्याला मतदान करावे, यासाठी भाजपने ऑपरेशन लोटस आणि ऑपरेशन शिवतेज राबवणार असल्याची चर्चा आहे.
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात बंड पुकारुन भाजपशी हातमिळवणी केल्यामुळं राज्यात राजकीय भूकंप आला आहे. भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले आहे. मात्र, ते टिकवण्याचे भाजपसमोर आव्हान असणार आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजपला 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली आहे. त्याअगोदर विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. अध्यक्षांना निवडूण आणण्यासाठी भाजपकडे सध्या पुरेसे पाठबळ नाही. त्यामुळं भाजपकडून दोन मिशन राबवण्यात येणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.


ऑपरेशन लोटस आणि शिवतेज?
राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट अजित पवारांच्या पाठीशी असल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांच्या शपथविधीला हजर असणाऱ्या आमदारांपैकी काही आमदार परतले आहेत. मात्र, अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त पद्धतीने घेतली जाते. त्यामुळं कोणी कुणाला मतदान केले हे समजणार नाही. याचसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांचे मन वळवण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवले जाणार आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी जरी भाजपशी युती तोडली असली तरी अजूनही शिवसेनेचे काही आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. हे आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपल्याला मतदान करतील, असा भाजपच्या नेत्यांना विश्वास आहे. यासाठी भाजप ऑपरेशन शिवतेज राबवणार आहे. ही दोन्ही मिशन सुरु झाली असल्याची चर्चा आहे. यातूनच राष्ट्रावादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदांराना सपर्क करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. याची जबाबदारी राधाकृष्ण विखे-पाटील, गणेश नाईक, नारायण राणे, बबनराव पाचपुते आणि अन्य काही नेत्यांवर दिल्याची चर्चा आहे.

महाआघाडीकडून खबरदारी -
दरम्यान, आमदार फुटू नये यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी योग्य ती खबरदारी घेत आहेत. यासाठी तिन्ही पक्षांकडून आमदारांना एकत्रित हॉटेलमध्ये ठेवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने त्यांच्या सर्व आमदारांना अंधेरीतील ललित हॉटेलमध्ये ठेवलं आहेत. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कारणामुळे शिवसेनेच्या सर्व आमदारांना ललित हॉटेलच्या शेजारी असलेल्या द लेमन ट्री या हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे. राष्ट्रवादीचे सर्व आमदार सध्या रेनेसन्स हॉटेलमध्ये आहेत. त्यांनाही हयात हॉटेल हलवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या -

शरद पवारांच्या खंजिर प्रकरणाची ही पुनरावृत्ती : शालिनी पाटील

अजित पवार लोकांची दिशाभूल करत आहेत, आम्ही महाविकासआघाडीसोबतच - शरद पवार

शरद पवारच आमचे नेते, अजित पवारांचं ट्वीट, अजित पवार कोणत्या राष्ट्रवादीत माहीत नाही आव्हाडांची प्रतिक्रिया

Special Report | महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस? नारायण राणेंच्या वक्तव्याचा अर्थ काय? | ABP Majha