लातुर : खरीपातील पिकाची काढणी होऊन दीड महिना लोटला तरी यावर्षी मराठवाड्यात रब्बीची लगबग पहायला मिळत नाही, पावसाने ओढ दिल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. कधी नव्हे ते यावर्षी मराठवाड्यातील अनेक गावात शेतकऱ्यांनी अजूनही चाढ्यावर मूठच धरलेली नाही. लातूर जिल्ह्यातील फक्त पाच टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे.
लातूर ,उस्मानाबाद ,परभणी ,हिंगोली आणि नांदेड या मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात पावसाने सुरुवातीला साथ दिली, मात्र त्यानंतर पावसाने पाठच फिरवली. यामुळे या भागातील खरीप पिके प्रभावित झाली. हातातोंडाशी आलेलं पीक कसं तरी जगलं मात्र उत्पादन खर्च ही वसूल झाला नाही.
खरीप हातचा गेल्यानंतर आशा होती रब्बीवर.. मात्र अजूनही या भागात पाऊस नसल्याने रब्बीच्या पेरण्याच झालेल्या नाहीत. मराठवाड्यातील या पाच जिल्ह्यात अवघ्या पाच टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये लातूर 11.10 टक्के, उस्मानाबाद 0.70 टक्के, परभणी 1.48 टक्के, हिंगोली 8.54 टक्के, नांदेड 10.94 टक्के पेरणी झाली आहे. पाणीसाठा असेल तरच पेरणी करा असा सल्ला कृषी विभाग शेतकऱ्यांना दिला आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना तर यावर्षी संधीच नाही.
खरीप उत्पादनात घट झाली तरी काही ठिकाणी तुरळक पिके शेतकऱ्यांच्या पदरी पडली होती. मात्र, रब्बी हंगामासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. पेरणीसाठी आवश्यक असलेली ओलही जमिनीत नसल्याने उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर तालुक्यात पेरा शून्य टक्यांवर आहे. तर उर्वरीत 6 तालुक्यामध्येही केवळ 10 टक्के पेरणी झाली आहे.
सप्टेंबरच्या अखेरीसच दरवर्षी रब्बी हंगामाला सुरूवात होते. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांनी बी-बियाणे देखील विकत घेण्याचं धाडस केलेलं नाही. ज्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध पाणीसाठा आहे त्याच शेतकऱ्यांनी रब्बीत पेरण्या उरकल्या आहेत. जनावराच्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची चिंता ऐन हिवाळ्यातच सुरू झालीय.
जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र एक लाख 93 हजार हेक्टर असले तरी दरवर्षी तीन लाखापर्यंत पेरा होत असतो. त्यामुळे यंदा सरासरीच्या दुपटीने नव्हे तर सरासरी इतकाही पेरा होणार नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. सर्व जलस्त्रोत तळाला गेले असून शेतकऱ्यांना भविष्यातील पाणीटंचाई सतावतेय. चाकूर तालुक्यातील गांजूर गावात शेतकऱ्यांनी यावर्षी रब्बीची पेरणीच केलेली नाही.