धुळे : ऐन दिवाळीच्या काळात एसटीच्या तिकीट दरात वाढ होणार आहे. आज मध्यरात्रीपासून 20 नोव्हेंबर पर्यंत हंगामी दहा टक्के भाडेवाढ होणार आहे.सलग चौथ्या वर्षी दिवाळीच्या कालावधीत हंगामी भाडेवाढ होत आहे.


वीस दिवसांसाठी म्हणजेच 1 ते 20 नोव्हेंबर पर्यंत ही भाडेवाढ असेल. राज्यातील एसटीच्या सर्व आगारात यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात सेवा निहाय 10, 15 आणि 20 टक्के भाडेवाढ होती. यंदा मात्र एकसमान अशी दहा टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे.

गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीनं तीस टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याचा अधिकार एसटीच्या उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालकांना आहे. त्याच अधिकाराचा वापर करुन ही दरवाढ करण्यात आली आहे.

खाजगी एसटीच्या दरापेक्षा दिडपट दरवाढ करण्यची मुभा खाजगी ट्रॅव्हल्सना असल्याने, सणासुदीच्या काळात ट्रॅव्हल्सच्या दरात पण वाढ होणार आहे. एकूणच या दरवाढीमुळे काही दिवस प्रवाश्यांच्या खिश्यावर भार पडणार हे मात्र नक्की.