Palghar Rain: पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होते आणि त्याच्या अभावामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचे मार्गही बंद होतात, असाच काहीसा प्रकार पालघर (Palghar) जिल्ह्यात घडला आहे. मुसळधार पावसामुळे पालघरमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. बंधारे पाण्याखाली गेले आहेत आणि गावागावांतील रस्तेही बंद झाले आहेत. पालघरच्या विक्रमगडमधील (Vikramgad) दोन महिन्याच्या चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


पावसामुळे नदीचे पाणी वाढल्याने बंधारा पाण्याखाली गेला आहे. पाड्यावरून दवाखान्यात जाणारी वाटच बंद झाली. रस्ता बंद झाल्यामुळे चिमुकलीला वेळेत उपचार मिळू शकले नाही आणि रुग्णालयात पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला.


विक्रमगडमधील मलवाडा म्हसेपाडा येथील लावण्या नितीन चव्हाण ही चिमुकली दोन दिवसांपूर्वी अचानक तापामुळे आजारी पडली. त्यानंतर श्वसनाचा जास्त त्रास होऊ लागल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला उपचारासाठी मलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्याचा निर्णय घेतला. पावसाळ्यात म्हसेपाड्याला गारगाई आणि पिंजाळ या दोन नद्यांचे पाणी वेढा घालत असल्याने पाड्याबाहेर पडण्यासाठी येथील ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते. पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे मलवाडा म्हसेपाड्याला जोडणारा नदीवरील लहान बंधारा पाण्याखाली गेला होता.


पन्नासपेक्षा अधिक कुटुंबांची वस्ती असलेल्या या पाड्याला चारही बाजूंनी नदीच्या पाण्याने वेढा घातला असल्याने या चिमुकलीला घेऊन कुटुंबियांनी आड रस्त्याने प्रवास सुरू केला. हा आड रस्ता लांबून असल्याने रुग्णालयात पोहचण्याआधीच या मुलीचा मृत्यू झाला. या मयत चिमुकलीच्या मृतदेहाचं विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं असून मृत्यूचं कारण अजूनही समोर आलेलं नाही.


चिमुकलीच्या मृत्यूमुळे पालघर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून आजही पालघरच्या ग्रामीण भागातील अनेक गावं-पाडे हे रस्त्यांविना असल्याचं धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा उघड झालं आहे. म्हसेपाड्याला जोडणारा नदीवरील पूल तयार करावा, अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थ मागील अनेक वर्षांपासून करत आहेत. परंतु या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. एका बाजूला पालघर जिल्ह्यातून बुलेट ट्रेन (Bullet Train), मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्ग (Mumbai-Baroda Expressway) असे देशाला जोडणारे प्रकल्प जात असताना, दुसऱ्या बाजूला याच पालघर जिल्ह्यात प्राथमिक सोई-सुविधांचा बोजवारा उडाल्याचं दिवसेंदिवस उघड होत आहे.


हेही वाचा:


New Delhi: दिल्ली पुन्हा हादरली! श्रद्धा वालकरसारखं आणखी एक हत्याकांड; उड्डाणपुलाखाली आढळले तरुणीचे तुकडे