नाशिक : रोख व्यवहार करण्यापेक्षा ऑनलाईन व्यवहार करण्यावर लोकांचा कल वाढत चालला आहे. त्यासाठी अनेक जण मनी ट्रान्सफर अॅपचा वापर करतात. मात्र ऑनलाईन व्यवहारही दिवसेंदिवस धोकादायक बनला आहे. कारण ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. तुम्ही पण ऑनलाईन व्यवहार करत असाल आणि त्यातही खास करुन फोन पे किंवा 'गुगल पे' सारख्या अॅप्सचा वापर करत असाल तर काळजी घ्या. कारण नाशिकमध्ये तीन दिवसात 14 नागरिकांना ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे..


नाशकात सायबर गुह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच आता फोन पे आणि गूगल पेच्या नावाखाली 14 नागरिकांची 1 लाख 89 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. "हॅलो सर मी फोन पे कंपनीमधून बोलतोय, आपला कॅशबॅक बराच पेंडिंग आहे. तो तुम्हाला कॅश स्वरुपात घ्यायचा असेल, तर आम्ही सांगतो तसे करा", अशा आशयाचे फोन कॉल नागरिकांना येतात. त्यानंतर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एक अॅप डाऊनलोड करा आणि त्या तुमच्या डिटेल्स भरा, असं सांगण्यात येतं. त्यानंतर अकाऊंटमधून पैसे गेल्याचं फसवणूक झालेल्यांनी सांगितलं.


अलताब सैय्यद या तरुणाची अशाप्रकारे 14 हजार 172 रुपयांची फसवणूक करण्यात आली. त्यानंतर अलताबने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. फोन पे तसेच गूगल पेच्या नावाखाली त्याच्यासारख्या 14 नागरिकांना गंडा घालण्यात आल्याचं समोर आलं आहे. ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी अनेक टोळ्या कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय असून अनोळखी कॉल्सला आपण माहिती देऊ नका, तसेच आपला ओटीपी नंबर कोणालाही शेयर करू नका, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.


एकीकडे रोख व्यवहार टाळत ऑनलाईन व्यवहाराकडे नागरिकांचा कल वाढला आहे. मात्र अशा घटनांमुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे अशा ऑनलाईन  मनी ट्रान्सफर अॅपचा वापर करावा की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे.


संबंधीत बातम्या