नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. यात खासकरुन पेटीएमच्या ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी जास्त आहेत. या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूजने पेटीएमशी संपर्क साधून याबद्दल जाणून घेतले. याविषयी माहिती देताना त्यांनी फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी पेटीएमच्या ग्राहकांना आवाहन केले आहे.


गेल्या 2 महिन्यांपासून पेटीएम ग्राहकांची फसवणूक झाल्याचे प्रकार वाढले असल्याची कबुली पेटीएम पेमेंट्स बँकचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट सुमित सोमानी यांनी एबीपी न्यूजशी बोलताना दिली. मागील 2 महिन्यांपासून ग्राहकांच्या फसवणुकीच्या सख्येत सातत्याने वाढ होत आहे. पेटीएमला दररोज 30 ते 40 ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या तक्रारी येत आहे. या तक्रारी जास्तकरुन दिल्ली, मुंबई, अशा मोठ्या शहरातून येत असल्याचे सोमानी यांनी सांगितले.

अशी होते ऑनलाईन फसवणूक
पेटीएम केवायसीच्या नावाखाली ग्राहकांची सातत्याने फसवणूक होत आहे. यात केवायसीची मर्यादा संपल्याचा फोन ग्राहकांना करुन मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर मागितला जातो. अनेक लोकांना लाखोंचा गंडा याद्वारे घालण्यात आलेला आहे. तर, कधी थर्ड पार्टी अॅप डॉउनलोड करायला सांगितले जाते. यात सरतेशेवटी ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे गायब झालेले असतात. जोपर्यंत ग्राहकांना याची माहिती होते, तोर्यंत उशिर झालेला असतो. असाच फ्रॉड इतर अॅपच्या माध्यमातूनही करण्यात येत आहे. मात्र, पेटीएमच्या नावाखाली फसवणूक झालेल्या ग्राहकांची संख्या जास्त आहे.

या फसवणुकीच्या तक्रारी जास्तकरुन झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यातील ठराविक जिल्ह्यातून जास्त येत असल्याची माहिती, सुमित सोमानी यांनी दिली. झारखंडमधूल जमताडा आणि गिरडीह, बिहारमध्ये धनबाद आणि गया या जिल्ह्यातून तक्रारी आल्या आहेत. तर, पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद, नॉर्थ 24 आणि साउथ 24 विभागातील काही ठिकाणांहून या तक्रारी आल्या आहेत.

सायबर सेलच्या विश्लेषणानुसार, सरासरी 10 ते 15 हजारापर्यंत ग्राहकांची फसवणूक झालेली आहे. सोमानी म्हणाले, की दररोज पेटीएमच्या माध्यमातून 5 ते 6 कोटी रुपयांचे व्यवहार होत आहेत. यात 30 ते 40 फसवणुकीच्या तक्रारी येत असतील तर त्या सामान्य आहेत. मात्र, तरीही ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आम्ही या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करत आहे. यासाठी वेगवेगळ्या सुरक्षा पद्धतींचा वापर करण्यावर आम्ही भर देणार असल्याचे सोमानी यांनी सांगितले.

पेटीएमचे आवाहन -
जर तुम्हाला कोणी कॉल करून सांगतिले की, पेटीएम केवायसी समाप्त झाली आहे. अथवा एसएमएसच्या माध्यमातून ती पुर्ण करा. तर अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. कोणतेही पेटीएम अथवा पेटीएमचे कर्मचारी अशाप्रकारे कॉल करुन कधीच केवायसी प्रक्रिया पुर्ण करण्यास सांगत नाहीत. थर्ड पार्टी अॅप मोबाईलमध्ये इंस्टॉल करु नका. कंपनीने म्हटले आहे की, ग्राहकांचे केवायसी केवळ त्यांच्या एजेंटद्वारे केले जाते. याशिवाय तुम्ही पेटीएम अॅपवर देखील मिनिमम केवायसी प्रक्रिया पुर्ण करू शकता. त्यामुळे पेटीएमच्या नावाखाली येणाऱ्या कॉलला उत्तर देऊ नका. अन्यथा तुमचे खाते रिकामे होईल.

संबंधित बातम्या :

Online Fraud बँकेतून बोलतोय सांगत क्रेडिट कार्ड धारकांना लाखोंचा गंडा

नाशिकमधील ऑनलाईन फसवणुकीमागे पाकिस्तान कनेक्शन ?

कोल्हापूर अर्बन बँकेला ऑनलाईन गंडा, लाखो रुपये 34 खात्यांवर ट्रान्सफर

Online Fraud I बँकेतून बोलतोय सांगत क्रेडिट कार्ड धारकांना लाखोंचा गंडा I एबीपी माझा