बार्शी: आठवड्याभरात 300 ते 400 रुपयांनी काद्यांचा भाव गडगडल्यानं कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. काद्यांची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यात कांदा 350 ते 500 रुपये क्विंटल दरानं विकला जात आहे.
एकीकडे कांद्याची आवक वाढली आहे, तर दुसरीकडे परराज्यात कांद्याची मागणीही कमी झाली आहे. त्यामुळे कांद्याचे दर गडगडले आहेत. त्यामुळे दुष्काळाने आधीच डोकेदुखी वाढवलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
उस्मानाबादच्या बालाजी दराडे यांनी रक्ताचं पाणी करुन 50 गोण्या कांदा उगवला. वाटलं दर मिळेल, तर पुढचा हंगाम सरेल... पण बार्शीच्या आडत बाजारात शनिवारी कहरच झाला. कांदा विकलाच गेला नाही.. बालाजी यांनी दोन दिवस मुक्काम ठोकला... कांदा खराब होऊ नये म्हणून मजुरी देऊन सुकवत घातला... त्या कांद्याला नव्या गोण्या घेतल्या... दोन दिवसांनी कांदा विकला... तर हातात आला खुळखुळा .
दोन दिवसांनी कांदा विकला, तर दर आला 1 रुपया 75 पैसे... सगळा कांदा विकून बालाजी यांना 1 हजार 800 रुपये मिळाले. हमाली, तोलाई, वाहतूक असा सर्व खर्च वजा करुन अडत्याचे बालाजी यांच्याकडे 1 हजार 395 रुपये थकले आहेत. गेल्या 4 दिवसांपासून बालाजी अडत्याचे पैसे चुकते करण्यासाठी जमवाजमव करत आहेत.
2 हजार किलो कांदा विकून शेतकरीच तोट्यात येऊच कसा शकतो? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.. बालाजी यांचं उदाहरण प्रातिनिधिक आहे... राज्यातल्या सर्वच बाजारपेठांमध्ये हीच अवस्था आहे...
इथे कांदा 1 रुपये 75 पैशानं विकला जातो... मुंबईतल्या बाजारात तोच कांदा दसपटीनं तुमच्या पिशवीत पडतो... मॅक्डॉनल्ड्स किंवा सबवेमध्ये त्याच कांद्याचा एक स्लाईस भाव खाऊन जातो. टाकून दिलेल्या कांद्याचा आपण विचारही करत नाही.