जळगाव : माणसाने स्वप्न पाहणे आवश्यक आहे, परंतु स्वप्न असे पाहायला हवे की, भल्या भल्यांच्या झोपा उडाल्या पाहिजेत. जसे मी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले आणि अनेकांच्या झोप उडाल्या होत्या, असे स्वतःचे उदाहरण देत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विद्यार्थ्यांना मोठं होण्याचं स्वप्न पाहण्याचा सल्ला दिला आहे. जळगावमधील भुसावळ येथे एका शालेय स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमात खडसे बोलत होते.


भुसावळ येथील नाहाटा विद्यालय येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि गुरुनाथ फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी खडसे यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्नं पाहण्यास सांगितले. ते सांगताना खडसेंनी स्वतः पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांबाबत सांगितले.

खडसे म्हणाले की, "प्रत्येकाने स्वप्न पाहणे आवश्यक आहे, परंतु स्वप्न अशी पाहायची की, भल्या भल्यांच्या झोपा उडाल्या पाहिजेत. जसे मी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले आणि अनेकांच्या झोप उडाल्या होत्या." एकाच आठवड्यात दोन वेळा खडसेंच्या मनातली मुख्यमंत्रीपदाबाबदची खदखद बाहेर आली आहे.

काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील सावदामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित 'एक शाम नाथाभाऊ के नाम' या मुशायराच्या कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केली होती. खडसे या कार्यक्रमात म्हणाले होते की, "चाळीस वर्षांच्या काळात मला अनेक मंत्रिपदं मिळाली, मात्र मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिले म्हणून कोणताही गुन्हा नसताना आपली ही अवस्था झाली". दरम्यान,आज पुन्हा एकदा खडसेंनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केली.

VIDEO | 'मुख्यमंत्री की ख्वाहिश कि इसलिये तो ये हालत हुई', एकनाथ खडसेंच्या मनातली खदखद पुन्हा उघड