सातारा : काल (शुक्रवारी) पादचाऱ्याला उडवून जाणाऱ्या विशेष पोलीस महानिरिक्षकाचा दर्जा असलेल्या अधिकाऱ्याच्या गाडीला ग्रामस्थांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले होते. परंतु गाडीत पोलीस अधिकारी असल्याचे समजल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल न करताच त्याला गाडीसहीत सोडून दिलं होतं. परंतु एबीपी माझाने या घटनेचे वृत्त प्रसारित केल्यानंतर अखेर याप्रकरणी आज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या गाडीने उडवलेल्या पादचाऱ्याचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी पुणे-बंगळुरु महामार्गावरील साताऱ्याच्या हद्दीत डीमार्टसमोर काळ्या रंगाच्या इनोव्हा कारने (MH 09 EE 0108) एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. गाडीच्या धडकेने पादचारी खूप दूरपर्यंत उडाला आणि या अपघातात गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ही कार तिथे न थांबता निघून गेली. स्थानिकांनी हा अपघात पाहिल्यानंतर गाडीचा पाठलाग केला. स्थानिकांनी ही कार आनेवाडी टोल नाक्याजवळ अडवली.
टोलनाक्याजवळ पकडलेली कार आणि चालकाला स्थानिकांनी भुईंज पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. गाडीत विशेष पोलीस महानिरिक्षक असल्याचे लक्षात आल्यावर पोलीस हतबल झाले आणि त्यांनी पोलीस ठाण्यात कोणत्याही नोंदी न करताच ही इनोव्हा गाडी सोडून दिली होती.
काल या प्रकरणाबाबत पोलिसांनी काही बोलण्यास नकार दिला होता. परंतु एबीपी माझाने या घटनेचे वृत्तांकन केले. या बातमीमुळे पोलीस प्रशासनाला जाग आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पादचाऱ्याला उडवून पळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरवर अखेर गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Mar 2019 05:50 PM (IST)
पादचाऱ्याला उडवून जाणाऱ्या विशेष पोलीस महानिरिक्षकाचा दर्जा असलेल्या अधिकाऱ्याच्या गाडीला ग्रामस्थांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले होते. परंतु गाडीत पोलीस अधिकारी असल्याचे समजल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल न करताच त्याला गाडीसहीत सोडून दिलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -