अकोला : एक दिवस शेतकऱ्यांसोबत या उपक्रमांतर्गत संपूर्ण जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्र्यांनी अकोल्याच्या शेतकऱ्यांसह संपूर्ण दिवस बांधावर घालवला. अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील आणि प्रशासनाने शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या.


रणजीत पाटील आणि प्रशासनाने अकोला तालुक्यातील डोंगरगाव, मासा-सिसा, उदेगाव येथे भेट दिली. रणजीत पाटील आणि जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी डोंगरगावचे शेतकरी मधुकर देवकर यांच्या शेतात हातावर भाकरी घेत भोजनाचा आनंद घेतला.



या उपक्रमात पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी आणि सूचना ऐकून घेतल्या. हे अभियान जिल्हाभरात राबवलं गेलं. विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुमारे 10 हजार शेतकऱ्यांशी याद्वारे संवाद साधण्यात आल्याची माहिती देण्यात आली.



शेतकरी भेटीदरम्यान पालकमंत्र्यांनी डवरणीचाही अनुभव घेतला. तर शेतमजुरांशी संवाद साधत त्यांच्याही अडचणी समजून घेतल्या. शेतकऱ्यांसाठी नेते-अधिकारी आपल्या बांधावर आल्याचा हा शेतकऱ्यांसाठी आणि मजुरांसाठी सुखद धक्का होता.

शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणि उपक्रम येतात आणि जातातही. अकोल्याच्या जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्र्यांचा हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. मात्र या भेटीदरम्यान शेतकऱ्यांकडून ऐकून घेतलेल्या समस्या, त्यांच्या गरजा यावर उपाय शोधले जातील आणि त्यांची अंमलबजावणी केली जाईल, एवढीच अपेक्षा आता शेतकऱ्यांना आहे.