नाशिक : मुलं पळवणारी टोळी समजून जमावाने धुळे जिल्ह्यात पाच जणांचा जीव घेतल्याची घटना ताजी असतानाच जवळच मालेगावातूनही अशीच घटना समोर आली आहे. मालेगावातील अकबर हॉस्पिटलच्या परिसरात चार जणांना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली.


मुलं पळवणारी टोळी असल्याचं समजून जमावाकडून चार जणांना बेदम मारहाण करण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस वाहनाचीही मोडतोड करण्यात आली. शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

धुळ्यात पाच जणांचा मृत्यू

राईनपाडा हे साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी गाव आहे. या गावाच्या आठवडे बाजारात काहीजण फिरत होते. हे फिरणारे लोक मुले पळवणारी टोळी आहे, असा संशय घेऊन 1 जुलैला दुपारी त्यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात डांबून मारहाण करण्यात आली.

मुलं पळवण्याच्या संशयातून पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राईनपाडा गावात नागरिकांनी 5 जणांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना ग्रामपंचायतच्या खोलीत डांबण्यात आलं. तिथंही त्यांना बेदम मारहाण झाली. यावेळी संपूर्ण खोलीत रक्ताचा सडा पडलेला दिसला. मारहाण झालेले एका कोपऱ्यात विव्हळत असतानाही त्यांच्यावर उपचार करायचे सोडून, जमावाकडून त्यांना मारहाण सुरुच राहिली. आणि त्यातचं या पाचही जणांचा जीव गेला.

मृतांपैकी भारत शंकर भोसले, दादाराव शंकर भोसले, भारत शंकर मालवे, अगनू इंगोले हे चौघेजण सोलापुरातील मंगळवेढा येथील राहणारे होते, तर राजू भोसले कर्नाटकमधील राहणारे होते.

आतापर्यंत मारहाणीच्या घटना कुठे-कुठे?

सर्वात अगोदर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चांदगाव भागात 8 जून रोजी चोर समजून सात जणांना बेद मारहाण करण्यात आली. यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर औरंगाबादमध्येच 16 जून रोजी पडेगावमध्येही एकाचा अशाच प्रकारामध्ये मृत्यू झाला. ईद मागण्यासाठी आलेल्या दोन बहुरुप्यांना मारहाण करण्यात आली होती.

औरंगाबादमधील कमळापूरमध्ये महिला नव्या घराच्या शोधात असताना मुलं पळवण्याच्या शोधातून जमावाकडून मारहाण करण्यात आली.

लातूरमध्ये औसा तालुक्यातील बोरफळामध्ये 29 जून रोजी नवरा-बायकोच्या भांडणाला मुले पळवण्याचं स्वरुप देऊन मारहाण करण्यात आली.

लातूर जिल्ह्यातील निलंग्यातील हलगरामध्ये रिक्षाचालकाला बेदम मारहाण करण्यात आली. जमावाने रिक्षाही जाळली.

29 जून रोजी नंदुरबारमध्ये भिक्षुकी करणाऱ्या पाच जणांना जमावाकडून मारहाण करण्यात आली. मुलगी तिच्याच घरात सापडल्याने प्रकरणावर पडदा पडला.

परभणीत 20 जून रोजी मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरुन दोन जणांना मारहाण करण्यात आली आणि नंतर त्यांना पोलिसांना देण्यात आलं.

सोशल मीडियावरील अफवांमुळे गैरसमज

राज्यात आतापर्यंत मुलं पळवणारी टोळी समजून अनेक मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. मात्र सोशल मीडियावरील व्हायरल होणाऱ्या अफवांमुळे गावकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर मुलं पळवणारी टोळी आली असल्याचे मेसेज व्हायरल केले जात आहेत. हे मेसेज वाचल्यानंतर गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण होत आहे. त्यामुळे गावातील सुशिक्षित मंडळींनी गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेण्याची गरज आहे.

पोलिसांच्या वतीने जाहीर आवाहन

वाढत्या घटना पाहता राज्यातील विविध जिल्ह्यातील पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.

सर्व जनतेस सूचित करण्यात येते की, मागील काही दिवसापासून काही समाजकंटक व्हाट्सअॅप, फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून मुले पळवणारी टोळी आली किंवा चोर आले अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत. अशा अफवांमुळे इतर जिल्ह्यात जमावाकडून बहुरूपी, वाटसरू, भिकारी आणि अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले आहेत, तर काही घटनांत खून झाले आहेत. त्यातून अशा जमावावर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या धुळे, नंदुरबार, जळगांव, नाशिक  जिल्ह्यातही अशा अफवा पसरविल्या जात असून लोकात भीती पसरली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेक घटना समोर येत आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिसांकडून जनतेस आवाहन करण्यात येत आहे की, अफवांवर विश्वास ठेऊ नका. अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. जर कोणी अशा अफवा पसरवत असेल तर त्याचे नाव पोलिसांना कळवावे. खात्री केल्याशिवाय सोशल मीडियावर आलेला कोणताही मेसेज अन्य ठिकाणी फॉरवर्ड करू नये. सोशल मीडियातून आलेल्या मेसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. अफवा पसरवणाऱ्या तुमच्या प्रत्येक पोस्टवर पोलिसांचे लक्ष आहे. अफवा पसरवण्यास हातभार लावल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अफवेला बळी पडून आपल्या हातून गंभीर गुन्हा घडल्यास संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकांनी स्वतःहून कायदा हातात घेऊ नये. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे आणि ही माहिती आपल्या सर्व कॉन्टॅक्ट आणि गृपला शेअर करावी. असे आवाहन करण्यात येत आहे.

संपर्क :-

नियंत्रण कक्ष - ०२५३-२३०९७१५

सायबर पो स्टे - ०२५३-२२००४०८

स्थागुशा - ०२५३-२३०९७१०

व्हाट्स अॅप - ९१६८५५११००

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस

ग्राम सुरक्षा दलाचं काय झालं?

ग्रामीण भागात महिलांवरील अत्याचार आणि इतर अनेक गुन्ह्यांची वाढती संख्या पाहता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ग्राम सुरक्षा दलाची मागणी केली होती. राज्य मंत्रिमंडळाने त्याला मंजुरीही दिली. मात्र अंमलबजावणी झालेली दिसत नाही. प्रत्येक खेड्यात जाऊन गुन्हेगारी घटनांवर पोलीस लक्ष ठेवू शकत नाहीत, तेवढी पोलिसांची संख्या नाही. त्यामुळे ग्राम सुरक्षा दल मजबूत करण्यात येईल, असं सरकारने म्हटलं होतं.