जळगावच्या भाजप आमदाराचा इमानदार कुत्रा चोरीला!
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव | 02 Jul 2018 10:32 AM (IST)
जळगावात भाजपा आमदार चंदूभाई पटेल यांच्या ल्याब्राडोर जातीच्या कुत्र्याची चोरी झाली आहे.
जळगाव: चोऱ्या घरफोड्या या सारख्या घटना नेहमीच आपल्याला ऐकायला मिळत असतात. मात्र जळगावात भाजपा आमदार चंदूभाई पटेल यांच्या ल्याब्राडोर जातीच्या कुत्र्याची चोरी झाली आहे. कुत्राचोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तीन चोरटे मोटारसायकलवरुन आमदार चंदूभाई पटेल यांच्या घराजवळ आल्याचं सीसीटीव्हीत दिसतं. घराच्या अवती भोवती फिरुन या चोरट्यांनी रेकी केली. त्यानंतर पटेल परिवाराची नजर चुकवून चोरट्यांनी कुत्रा पळवून नेला. आपल्या लाडक्या कुत्र्याची चोरी झाल्याने पटेल परिवाराने शहरातील रामानंद पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. पोलिसांनी कुत्र्याचा शोध सुरु केला आहे .आमदाराचा कुत्रा असल्याने पोलिसही त्याचा गांभीर्याने शोध घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.