On this day in history January 27 : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 27 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ आणि ठाणेकरांचा साहेब अर्थात आनंद दिघे यांची आज जयंती आहे. त्याशिवाय आजच्याच दिवशी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली होती. तर जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचा युद्धात एकमेव पराभव झाल्याची नोंद आहे. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. 


आनंद दिघेंचा जन्म -


बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ आणि ठाणेकरांचा साहेब अर्थात आनंद दिघे यांची आज जयंती आहे.  आजच्याच दिवशी म्हणजे 27 जानेवारी 1952 रोजी ठाण्यात आनंद दिघे या वादळानं जन्म घेतला होता. ठाण्यात शिवसेना वाढवण्याचं काम आनंद दिघे यांनी केलं. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आनंद दिघे यांचे शिष्य आहेत. आनंद दिघे हे शिवसेना पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख होते. त्यांनी ठाण्यात शिवसेनेचा प्रभाव वाढवण्यासाठी रात्रीचा दिवस केला. आनंद दिघे यांना मानणारा एक मोठा वर्ग आजही ठाण्यात आहे. 26 ऑगस्ट 2001 साली गणेशोत्सवादरम्यान आनंद दिघे यांच्या कारला अपघात झाला होता. जखमी आनंद दिघेंवर ठाण्यातल्या रुग्णालयात शस्त्रक्रियाही करण्यात आली, पण नंतर हृदयरोगाच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झालं होतं. आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाण्यात त्यांच्या समर्थकांचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला होता. समर्थकांनी सिंघानिया हॉस्पिटल पेटवून दिलं होतं. 


बालभारतीची स्थापना -


1967 : आजच्याच दिवशी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली होती. सद्ध्या ही संस्था ’बालभारती’ या नावाने ओळखली जाते. वसंतराव नाईक सरकारच्या काळात या संस्थेची स्थापना झाली. आतापर्यंत मंडळाला पहिली ते सातवीपर्यंतची जवळपास 400 पाठ्यपुस्तके तयार केली आहेत.  विद्याविभाग, सामान्य प्रशासन विभाग, वितरण विभाग, वित्त विभाग, अंतर्गत-लेखापरिक्षण विभाग,  निर्मिती विभाग, संशोधन विभाग, ग्रंथालय विभाग, किशोर अशा नऊ विभागात विभागण्यात आलेय. 


अमेरिकेचा युद्धात एकमेव पराभव -


जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचा युद्धात एकमेव पराभव झाल्याची नोंद आहे. हा पराभव व्हिएतनामविरोधात स्वीकारावा लागला होता. व्हिएतनाम युद्धाची सुरुवात 1954 च्या सुमारास सुरू झाली होती. व्हिएतनाममधील कम्युनिस्ट नेते हो चि मिन्ह यांच्या नेतृत्वात व्हिएतनामच्या सैन्याने, जनतेने गनिमी काव्याने अमेरिकेचा सामना केला. या युद्धानंतर दक्षिण आणि उत्तर व्हिएतनामचे विलिनीकरण झाले आणि व्हिएतनाम देश स्थापन झाला.


थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतले


आजच्याच दिवशी 1980 मध्ये थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतले होतं. लाईट बल्बचा शोध डेव्हिड, स्वान आणि थॉमस एडिसन यांनी लावण्यासाठी प्रयत्न केले होते.  पण लाईट बल्ब पूर्णपणे विकसित करण्याचे काम थॉमस अल्वा एडिसन यांनी केले. जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसन यांनी लावलेल्या शोधांमुळेच... 


लक्ष्मणशास्त्री जोशींचा जन्म - 


लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा आजच्याच दिवशी 1901 मध्ये जन्म झाला होता. महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचे एक प्रमुख उद्‍गाते, विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक आणि साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष होते. 1923 मध्ये कोलकात्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून त्यांनी  पदवी संपादन घेतली होती. 27 मे 1994 रोजी त्यांचं निधन झालं. 


अभिनेते अजित यांचा जन्म -


1922 मध्ये अभिनेते अजित खान उर्फ अजित यांचा जन्म झाला होता. हिंदी चित्रपटातील खलनायकाची त्यांनी केलेल्या भूमिका खूप गाजल्या आहेत. जंजीर, कालीचरण, नया दौर, यादो की बरात या गाजलेल्या चित्रपटात अजित यांनी महत्वाच्या भूमिका केल्या. 22 ऑक्टोबर 1998 मध्ये त्यांचं निधन झालं. 


बॉबी देओलचा जन्म -


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) याचा 1967 मध्ये जन्म झाला होता.  गुप्त (Gupt), अजनबी (Ajnabi), बिच्छू (Bichchoo) आणि हमराज (Humraz) या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


पश्चिम बंगालमधील 13 जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याची घोषणा -


पश्चिम बंगालमधील 13 जिल्ह्यात बर्ड फ्लू या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची घोषणा आजच्याच दिवशी 2008 मध्ये करण्यात आली. कोंबड्या पाळणाऱ्यांना बर्ड फ्लू रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला होता. 16 जानेवारी 2008 मध्ये बीरभूम जिल्ह्यात प्रथम बर्ड फ्लू पसरल्याचं समोर आले होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अंडी, कोंबडीची पिले, पोल्टी नष्ट करण्यात आल्या होत्या. लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. बर्ड फ्लू(bird flu) हा पक्षी, मानव आणि प्राण्यांना देखील होत असल्याने याचा धोका सर्वांना आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने यामध्ये जीव जाण्याचा देखील धोका आहे. H5N1 एवियन इंफ्लूएंजा असे या विषाणूचे सर्वसामान्य रूप आहे. 


1944  : सोव्हियत लष्करानं जर्मनी आणि फिनलँडच्या सैनिकांना सेंट पीटर्सबर्गमधून बाहेर काढत 872 दिवसांची घेराबंदी संपवली.  अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या युद्धाला पुर्णविराम मिळाला होता. 


1973 : पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये 31 वर्षे चालू असलेल्या ’व्हिएतनाम युद्ध’ संपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रालाही व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली.


1959  : पहिल्या कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नोलॉजीची स्थापना दिल्लीमध्ये करण्यात आली. 
 
1967 : अमेरिकेतील फ्लोरिडाच्या केप केनेडी अंतराळ केंद्रात अपोलो 1 या अंतराळयानाच्या चाचणी दरम्यान आग लागली होती. यामध्ये गस ग्रिसम, एडवर्ड व्हाइट व रॉजर शॅफी या तीन अंतराळवीराचा मृत्यू झाला होता.  


2007 : पाकिस्तानमधील पेशावरमध्य एका धार्मिक कार्यक्रमात बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला होता, अनेकजण जखमी झाले होते. 


2013 - अफगाणिस्तानमधील कंदारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 20 पोलिसांचा मृत्यू झाला होता.