मुंबई: सप्टेंबरची 29 तारीख ही जगाच्या आणि भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. आजच्या दिवशी सहा वर्षांपूर्वी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी शिबिरांवर हल्ला करून त्यांना नेस्तनाबूत केलं होतं. तसेच अरब आणि इस्त्रायलच्या वादाचा आरंभबिंदू असणाऱ्या बाल्फोर डिक्लेरेशनला आजच्या दिवशी म्हणजे 29 सप्टेंबर 1923 रोजी लिग ऑफ नेशन्सने मान्यता दिली होती. जाणून घेऊया आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं होतं. 


1650- इंग्लंडमध्ये पहिल्या मॅरेज ब्युरोची सुरुवात 


आजच्या दिवशी 29 सप्टेंबर 1650 रोजी इंग्लंडमध्ये पहिल्या मॅरेज ब्युरोची (Marriage Bureau) सुरुवात करण्यात आली होती. हे मॅरेज ब्युरो जगातील सर्वात पहिले मॅरेज ब्युरो असल्याचं सांगितलं जातं. त्या काळी आपल्या विचारांशी जुळणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी या मॅरेज ब्युरोची सुरवात करण्यात आली होती. 


1836- मद्रास चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीची स्थापना 


मद्रास चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीची (Madras Chamber of Commerce and Industry) स्थापना 29 सप्टेंबर 1836 रोजी झाली. मद्रास चेबंर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री ही एक उद्योगासंबंधी नॉन गव्हर्नमेंटल संस्था आहे. सरकारच्या उद्योग, व्यापार आणि आर्थिक घटकांच्या संबंधित धोरणांवर प्रभाव टाकणे हा या संस्थेचा उद्देश आहे.  


1927- अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये टेलिफोन सेवा सुरू 


आजच्या दिवशी, 29 सप्टेंबर 1927 रोजी अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये पहिली टेलिफोन सेवा सुरू झाली. 


1923- बाल्फोर घोषणा, अरब-इस्त्रायल वादाची सुरुवात 


पॅलेस्टाईनच्या भूमीत ज्यू लोकांच्या इस्त्रायल या देशाला मान्यता देणाऱ्या बाल्फोर डिक्लेरेशन (Balfour Declaration) म्हणजे बाल्फोर जाहीरनाम्याला आजच्याच दिवशी म्हणजे 29 सप्टेंबर 1923 रोजी लिग ऑफ नेशन्सने मान्यता दिली. ब्रिटनचे तत्कालीन परराष्ट्र सचिव सर ऑर्थर बाल्फोर यांनी 2 नोव्हेंबर 1917 रोजी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यांच्या नावानेच या जाहीरनाम्याला बाल्फोर डिक्लेरेशन म्हटलं गेलं. केवळ 67 शब्दाच्या बाल्फोर जाहीरनाम्याने जगाचा इतिहास आणि भूगोल बदलला. या जाहीरनाम्यामुळे अरब देशांमध्ये एक प्रकारचा असंतोष पसरला. अरब आणि इस्त्रायल यांच्या वादाचा आरंभबिंदू म्हणून या जाहीरनाम्याकडे पाहिलं जातं. नंतरच्या काळात, 1948 रोजी इस्त्रायल देश अस्तित्वात आल्यानंतर हा वाद आणखीनच वाढला. 


1959- आरती साहा यांनी इंग्लिश खाडी पार केली 


भारताच्या आरती साहा यांनी 29 सप्टेंबर 1959 रोजी इंग्लिश खाडी पोहून पार केली. अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्याच आशियायी महिला ठरल्या. त्यांनी ही कामगिरी अवघ्या 19 व्या वर्षी केली. या खाडीतील मोठमोठ्या लाटा आणि गोठवणाऱ्या पाण्यामुळे ही खाडी पोहून पार करणे कठीण काम आहे. या खाडीला पाण्यातील माऊंट एवरेस्ट म्हणून ओळखलं जातं. 


1977- गंगा नदीच्या पाणी वाटपावर भारत-बांग्लादेशमध्ये करार 


गंगा नदीच्या पाणी वाटपावर 29 सप्टेंबर 1977 रोजी भारत आणि बांग्लादेशमध्ये एक करार करण्यात आला. त्यानुसार ठरलेल्या प्रमाणा दोन्ही देशांनी पाणी वापरण्याचं कबुल केलं. 


2016- भारताचा पाकिस्तानवर सर्जिकल स्टाईक 


आजच्या दिवशी म्हणजे 29 सप्टेंबर 2016 रोजी भारताने पाकव्याप्त  काश्मीरमधील दहशतवादी शिबिरांवर सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike Day) करत त्यांना नेस्तनाबूत केलं होतं. 18 सप्टेंबर 2016 रोजी जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमधील भारतीय सेनेच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यामध्ये 18 भारतीय जवान शहीद झाले होते. भारताने या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तानमध्ये हा हल्ला केला होता. जवानांच्या या कृत्यामुळे भारतीय लष्कराची जगभरात वाहवा झाली होती. तसेच जगभरात भारतीय लष्कराचं सामर्थ्य समोर आलं होतं. 


2020- कुवेतचे शासक शेख सबाह अल अहमद अल सबाह यांचे निधन 


कुवेतचे शासक शेख सबाह अल अहमद अल सबाह यांचे 29 सप्टेंबर 2020 रोजी निधन झालं. त्यावेळी ते 91 वर्षांचे होते. 2006 साली ते कुवेतचे शासक बनले होते.