नवी दिल्ली : आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह आणि पक्षाचं शिवसेना हे नाव कुणाला मिळणार याबाबत अद्याप संदिग्धता आहे. याचा निकाल लागण्यासाठी आणखी तीन ते चार महिने वेळ लागण्याची शक्यता आहे असं मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशींनी व्यक्त केलं आहे. तोपर्यंत चिन्ह आणि पक्षाचं नाव कुणालाही न देता त्याऐवजी इतर पर्याय देण्याची शक्यता आहे असंही मत एस. वाय. कुरेशी यांनी व्यक्त केलं आहे.


एबीपी माझाशी बोलताना एस. वाय. कुरेशी म्हणाले की, "पक्षामध्ये ज्या-ज्या वेळी फुट पडते त्या-त्या वेळी त्याबद्दल निर्णय हा निवडणूक आयोग घेते. 1967 रोजी ज्यावेळी काँग्रेसमध्ये पहिल्यांदा फुट पडली होती त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात ही गोष्ट गेली होती. त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय निवडणूक आयोग घेईल असे निर्देश दिले होते. अशा प्रकारात बहुमताच्या नियमाच्या आधारे निर्णय घेण्यात येतो."


एस.वाय. कुरेशी म्हणाले की, "महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा प्रश्न ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयात गेला होता, त्यावेळी न्यायालयाने पक्षचिन्हाच्या बाबतीत निवडणूक आयोगाने त्यावेळी निर्णय घेऊ नये असे निर्देश दिले होते. त्यावेळी मला आश्चर्य वाटलं होतं. आता न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात कोणताही हस्तक्षेप न करण्याची भूमिका घेतली आहे. पक्षाच्या फुटीचा प्रश्न किंवा चिन्हाबाबतचा वाद हा निवडणूक आयोगाच्या अधिकारात असतो."


दोन गटात जर पक्षचिन्हाबाबत वाद असेल आणि त्यापैकी एक गट जर निवडणूक आयोगाकडे गेलं तर निवडणूक आयोगाचे ते "कर्तव्य असतं की असं सांगत एस वाय कुरेशी म्हणाले की, याबाबत दुसऱ्या गटाला नोटिस देणं ही जबाबदारी असते. नंतर दोन्ही बाजूने उत्तर आल्यानंतर यावर सुनावणी होईल. दोन्ही बाजू ऐकून निवडणूक आयोग बहुमताच्या आधारे निर्णय देते. किती आमदार आणि खासदार तसेच निर्वाचित सदस्य आहेत आणि दुसरीकडे पक्षाचे पदाधिकारी कोणत्या बाजूला आहे, या दोन गोष्टींच्या आधारे निवडणूक आयोग निर्णय घेते."


याबाबत किती वेळ लागेल हे सांगता येत नाही


महाराष्ट्रात एक दोन महिन्यात महापालिकांच्या निवडणूका आहेत. त्याच्या आधी शिवसेनेच्या पक्षचिन्हाचा निर्णय लागणं अशक्य असल्याचं एस वाय कुरेशी यांनी म्हटलं.  ते म्हणाले की, "पदाधिकाऱ्यांच्या बोगस सह्यांची तपासणी करायला निवडणूक आयोगाला उशीर लागू शकतो. त्यामुळे याचा अंतिम निकाल लागण्यास नेमका किती वेळ लागणार हे आताच सांगता येणार नाही. त्यावर उपाय म्हणजे येत्या निवडणूक शिवसेना हे नाव आणि धनुष्यबान हे चिन्ह गोठवण्याची शक्यता आहे. हे चिन्हं दोन्ही गटांना मिळणार नाही. "


पक्षचिन्ह गोठवल्यानंतर या दोन्ही गटांना तात्पुरत्या स्वरुपाचं दुसरं चिन्ह आणि नाव देण्यात येतं असं एस वाय कुरेशी म्हणाले. 


सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येऊ शकेल


निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाविरोधात दोन्ही गटांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येणं शक्य असल्याचं एस वाय कुरेशी म्हणाले. पक्षाचं चिन्ह गोठवल्यानंतर पक्षांना उपलब्ध असलेल्या चिन्हांपैकी एखादं चिन्ह उपलब्ध असेल तर ते निवडता येतं. किंवा जर त्यांच्याकडे एखादं चिन्ह असेल आणि ते देशातील कोणत्याही पक्षाच्या चिन्हासोबत मिळतंजुळतं नसेल तर ते त्यांना देता येतं असं एस वाय कुरेशी यांनी म्हटलं.