19 April In History :  प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. आज 19 एप्रिल रोजीदेखील काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.  उत्क्रांतिवादाचा जनक चार्ल्स डार्विन यांचा आज स्मृतीदिन आहे. तर, आजच्या दिवशी भारताने विकसित केलेला आर्यभट्ट हा भारतीय उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला. त्याशिवाय इतरही मोठ्या घडामोडी आजच्या दिवशी घडल्या आहेत. 



जागतिक यकृत दिन: World Liver Day 2023


निरोगी यकृताचे महत्त्व समजून घेण्यासाठी आणि त्या बाबतीत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 19 एप्रिल रोजी यकृत दिन साजरा केला जातो. यकृत हा मानवी शरिरातील मोठा अवयव आहे. मेंदूनंतरचा हा दुसरा गुंतागुंतीचा अवयव असल्याचे म्हटले जाते. शरीरातील पचनसंस्थेचा हा एक महत्त्वाचा घटक आहे. हे पोट आणि आतड्यांमधून बाहेर पडणारे रक्त फिल्टर करते आणि नंतर या रक्तातील पोषक घटकांचे विघटन, नियमन आणि उत्पादन करते. म्हणूनच, आपल्या लिव्हरची योग्य काळजी घेणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. 


मागील काही वर्षात यकृतासंबंधीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. बदलती जीवनशैली, मद्यसेवन आणि इतर कारणांमुळे यकृतासंबंधीचे आजार वाढतात. 



1882:  उत्क्रांतिवादाचा जनक चार्ल्स डार्विन यांचे निधन


उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाणारे जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचा आज स्मृतीदिन. त्यांनी मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रशुद्धरीत्या उलगडून दाखवले.  Origin of Species हा त्यांचा उत्क्रांतीवादावरचा शोधप्रबंध गाजला. यातील सिद्धांत बायबलच्या विरोधात जात असल्याने त्यांच्याविरोधात 1860 मध्ये ऑक्‍सफर्डमध्ये विल्बर फोर्स या बिशपने सभा बोलावली. ले डी हूकर या शास्त्रज्ञाने डार्विनची बाजू सडेतोड व सोदाहरण मांडली. बिशपला डार्विनचा सिद्धांत मान्य करावाच लागला. 


1892 : शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचा जन्म


प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक ताराबाई मोडक यांचा जन्मदिन. वडील सदाशिवराव हे सुबोध पत्रिका या साप्ताहिकाच्या संपादनाबरोबरच हितोपदेश, कामगार ही साप्ताहिक आणि ज्ञानदीप हे मासिक चालवत असत. आई उमाबाई या  स्त्री शिक्षण, विधवा विवाहासाठी काम करत असे. बुद्धिमान व सुधारणावादी आईवडीलांमुळे ताराबाईंकडे बुद्धिमत्तेचा वारसा आला. 1914 मध्ये ताराबाई मुंबई विद्यापीठातून बी. ए. झाल्या.


शिक्षणाचा खरा पाया मुलांच्या बालवयातच घातला जाण्याची शक्यता व आवश्यकता असते, या दृष्टीने त्यांनी पूर्वप्राथमिक शिक्षणाचे नवीन पाऊल टाकले.1923-1932 ही नऊ वर्षे त्यांनी भावनगरच्याच दक्षिणामूर्ती शिक्षणसंस्थेत प्राध्यापिका म्हणून काम केले. 1933पासून त्यांनी शिक्षणाबाबची शिक्षणपत्रिका काढायला सुरुवात केली. 1936 साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली. पुढे बालशिक्षणाचे हे लोण महाराष्ट्रात पसरले. 1936-48 या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. या संस्थेने पुढे पूर्वप्राथमिक अध्यापन मंदिर सुरू केले. यातून मराठी आणि गुजराती या दोन्ही भाषांच्या हजारांहून अधिक शिक्षक-शिक्षिकांचे प्रशिक्षण झाले.


1910 : क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांचे निधन


अनंत लक्ष्मण कान्हेरे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारक संघटनेचे सदस्य होते. नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्यानंतरचे सर्वांत तरुण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले. 


1957 : भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा जन्म.


मुकेश धीरूभाई अंबानी यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी झाला. भारतीय उद्योगपती, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ते सर्वेसर्वा आहेत. मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत अग्रस्थानी आहेत. काळाची पावले ओळखून व्यवसाय करणे, नव्या क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्यासाठीदेखील ते ओळखले जातात. वडील धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतर धाकटा भाऊ अनिल अंबानी यांच्यासोबत मतभेद झाल्याने रिलायन्स समूहाची वाटणी झाली. मुकेश अंबानी यांनी त्यानंतर आपली स्वत:ची वेगळी छाप उद्योगक्षेत्रावर उमटवली. 


1975: भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अंतराळात प्रक्षेपित


आर्यभट्ट् हा भारताने विकसीत केलेला पहिला उपग्रह होता. भारतीय गणितज्ञ व खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव ह्या उपग्रहाला देण्यात आले होते. भारतीय उपग्रह तत्कालीन सोव्हिएत रशिया महासंघ आणि सध्याच्या रशियातील कापुस्टीन यार ह्या अवकाश केंद्रावरून 19  एप्रिल 1975 साली कॉसमॉस-३एम हा उपग्रह वाहक वापरून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आले. सौर उर्जेवर चालणारा आर्यभट्ट् उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) विकसीत केला होता. सुमारे पाच दिवस पृथ्वी भवती प्रदक्षीणा घातल्या नंतर उपग्रहाचा इस्रोशी संपर्क तुटला. 


2009: स्वातंत्र्यसैनिक अहिल्याताई रांगणेकर यांचे निधन


भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हिरिरीने सहभाग घेणाऱ्या आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील रणरागिनी अशी ओळख असलेल्या कम्युनिस्ट नेत्या कॉम्रेड अहिल्याताई रांगणेकर यांचा आज स्मृतीदिन. 1943 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर अहिल्याताईंनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. सुधारणावादी कुटुंबात जन्मलेल्या अहिल्याताईंना घरच्यांकडून पूर्ण पाठिंबा होता. त्यांचे मोठे भाऊ बी.टी.रणदिवे यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. बी.टी. रणदिवे हे भारतातील कम्युनिस्ट, कामगार चळवळीतील मोठे नेते होते. तेदेखील स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते. 


स्वातंत्र्य चळवळ जोरात असताना त्यातला महिलांचा सहभाग वाढला पाहिजे हे लक्षात घेतअहिल्याताई रांगणेकरांनी परळ महिला संघाची सुरुवात केली. यात बहुतेक सगळ्या कामगार वर्गातल्या महिला होत्या. 1946 मध्ये नाविकांचा उठाव झाल्यानंतर कम्युनिस्ट पक्षाने त्यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी कामगारांनी संप पुकारला होता. उपाशीपोटी लढणाऱ्या कामगारांना अन्न पुरवण्यासाठी आपल्या भगिनींसह अहिल्याताई जिवाची पर्वा न करता रणात उतरल्या.  परळच्या पुलाजवळ झालेल्या गोळीबारात त्यांच्या सहकारी, कम्युनिस्ट कार्यकर्त्या कमल दोंदे धारातीर्थी पडल्या. बहीण कमल रणदिवे यांच्या पायाला गोळी लागली. या हल्ल्यात 24 वर्षीय अहिल्याताई रांगणेकर थोडक्यात बचावल्या. 


संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांचं मोठं योगदान होतं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सेनापती बापट यांच्यावर पोलिसांनी केलेला लाठी हल्ला अहिल्याताईंनी आपल्या अंगावर घेतला. या हल्ल्यात त्यांचा डोळा थोडक्यात बचावला. मात्र, त्यांची एका डोळ्याची दृष्टी कमी झाली होती. या घटनेनंतर आचार्य अत्रे यांनी त्यांच्यावर कविता लिहित रणरागिनी अहिल्या अशी उपाधी दिली. 


समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्यासोबत महागाई प्रतिकार महिला समितीच्या माध्यमातून त्यांनी लाटणे मोर्चा काढून महागाईकडे सरकारचं लक्ष वेधलं. महागाईच्या मुद्यावरून त्यांनी त्या काळच्या मंत्र्यांना सळो की पळो करून सोडलं. स्त्रीमुक्ती चळवळीतही अहिल्याताई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हिंदू कोड बिलाचे त्यांनी समर्थन केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभेच्या ठिकाणी येणाऱ्या उजव्या विचारांच्या कार्यकर्त्यांना अहिल्याताई आणि महिलांनी पिटाळून लावले होते. देशातील महिला संघटना अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या संस्थापक नेत्या होत्या. आणीबाणीमध्ये त्या भूमिगत होत्या. पुढे 1977 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या खासदार म्हणून निवडून गेल्या. त्याआधी त्या मुंबई महापालिकेत नगरसेविका होत्या. अहिल्याताई रांगणेकर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्याशिवाय, माकपच्या केंद्रीय समितीवर अनेक वर्ष होत्या.