मुंबई : राज्यातील भाजपच्या लोकसभेच्या जागा घटणार असल्याचा कोणताही अहवाल आपण दिला नाही असं स्पष्टीकरण भाजप नेते विनोद तावडे यांनी दिलं. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील भाजपची ताकद वाढल्याचंही ते म्हणाले. राज्यातील भाजपची ताकद कमी झाल्याचा अहवाल विनोद तावडे यांच्या समितीने दिला असल्याच्या काही बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्यावर विनोद ताडवे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.


काय म्हणाले विनोद तावडे? 


भाजप नेते विनोद तावडे यांनी एक ट्वीट केलं असून त्यामध्ये ते म्हणतात की, "दिवसभर माध्यमांद्वारे मी कोणता तरी अहवाल सादर केला आहे ज्यात राज्यात भाजपाची ताकद कमी झाल्याचा दावा केला जात आहे. असा कोणताही अहवाल मी सादर केला नसून, भाजपाची शक्ती शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर उलट वाढलीच आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात झालेल्या विकासामुळे महाराष्ट्रात भाजपा अधिक मजबूतच झाली आहे."


 






काय आहे चर्चा? 


लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. या समितीने एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात महाराष्ट्रातील भाजपची ताकद कमी झाल्याचं नमूद करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये भाजपच्या जागा दुहेरी आकड्यात कमी होणार असल्याचं या अहवालात म्हटलं असल्याच्या बातम्या प्रसारित होत होत्या. महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये भाजपला फटका बसणार असल्याचं या अहवालात म्हटलं असल्याच्या चर्चा होत्या. 


महाराष्ट्रात भाजपची ताकद कमी झाल्याने त्याचा परिणाम येत्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी होणार असून त्यामुळे भाजपला फटका बसणार असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस 2 सुरू केल्याची चर्चा होती. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीच्या अजित पवारांना सोबत घेऊन राज्यात सत्ता स्थापन करण्यात येणार असल्याच्याही चर्चा होत्या. 


या सगळ्यावर आता भाजप नेते विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिलं असून असा कोणताही अहवाल आपण दिला नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 


ही बातमी वाचा: