Thane Fire : ठाणे जिल्ह्यातील सिने वंडर मॉलजवळ (Cine Wonder Mall) असलेल्या ओरियन बिझनेस पार्क (Orion Business Park) इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. आग जास्त भडकल्यानं शेजारच्या सिने वंडर मॉलला देखील आग लागली. तब्बल 10 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंआहे. दरम्यान, या आगीत इमारतीच्या आत पार्क केलेली 10 ते 12 वाहनेही जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


दुखापत किंवा जीवितहानी नाही


दरम्यान, या आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले होते. इमारतीमध्ये असलेल्या सर्व लोकांना वेळीच सुखरुप बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. ओरियन बिझनेस पार्क ही घोडबंदर रोड, ठाण्यातील पाच मजली व्यावसायिक इमारत आहे. अचानक ही आग लागल्यानं परिसरातील नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. 


आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु


घोडबंदर रोडला जोडणाऱ्या रस्त्यावर आगीचे मोठे लोळ येत आहेत. त्यामुळं रस्त्यावर रात्री वाहतूक कोंडी झाली होती. आग लागलेल्या इमारतीमध्ये काही लोक अडकले असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, सर्वांनी सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.  आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. ठाणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ठाणे पश्चिम भागातील सिने वंडर मॉलजवळील ओरियन बिझनेस पार्क, कापूरबावडी या ठिकाणी आग लागली. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान, फायर वाहन, रेस्क्यू वाहन, वॉटर टँकर, जम्बो वॉटर टँकर वाहनासह दाखल झाले. घटनास्थळी  लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहे.


आगीची माहिती मिळताच सिने वंडर मॉल रिकामा


ही आग लगतच्या सिने वंडर मॉलच्या काही भागात पसरली आहे. आगीची माहिती कळताच सिने वंडर मॉल रिकामा करण्यात आला. ओरियन बिझनेस पार्क इमारतीला आग लागल्याने काहीजण त्यात अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.  


 


महत्त्वाच्या बातम्या:


Mankhurd Fire : मानखुर्दमध्ये भंगाराच्या दुकानाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल