Today In History : इतिहासाच्या दृष्टीने प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते.  फेब्रुवारी महिन्यातील 18 तारीख ही अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार आहे. महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीत मोलाची भर टाकणारे पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा जन्म दिवस आहे. त्याशिवाय स्वामी विवेकानंद यांचे गुरू रामकृष्ण परमहंस आणि क्रांतीवीर मदनलाल धिंग्रा यांचाही जन्म दिवस आहे. पाहुयात आजच्या दिवशी इतिहासात नेमकं काय झालं?


1745: भौतिकशास्त्रज्ञ अलेस्सांद्रो व्होल्टा


अलेस्सांद्रो व्होल्टा हे इटालियन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी 1800 च्या दशकात बॅटरीचा शोध लावला होता. व्होल्टाच्या बॅटरीमुळं इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्राची पाळंमुळंच रोवली गेली. दोन धातू जवळ आणले आणि त्यांच्यामध्ये ओलसरपणा असला की वीज तयार होते हे वेगवेगळ्या प्रयोगाच्या अंती व्होल्टास यांच्या लक्षात आले. त्यांच्या संशोधनामुळे भविष्यातील वीज आणि त्यावर आधारीत संशोधन, उपकरण निर्मितींना बळ मिळाले. 


1823 :  लोकहितवादी यांचा जन्म


गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा आज जन्मदिवस. ते  मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते.  प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे लिहिली. लोकहितवादींनी समाजहिताला प्राधान्य देऊन सर्वांगीण सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठीचा आग्रह धरला होता. त्यांचा जातीव्यवस्था, वर्णभेद याला विरोध केला होता. 


1836: रामकृष्ण परमहंस यांचा जन्म


एकोणिसाव्या शतकातील भारतात बंगालमध्ये होऊन गेलेले जगद्विख्यात गूढवादी सत्पुरुष होते. स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे प्रमुख शिष्य होते. आधुनिक भारतीय धर्मप्रबोधनात त्यांनी कामगिरी बजावली. माझा धर्म बरोबर, दुसऱ्यांचा धर्म चूक; हे मत योग्य नाही. ईश्वर एकच आहे, त्याला वेगवेगळे लोक भिन्न भिन्न नावाने पुकारतात. कोणी म्हणते गॉड, कोणी अल्ला, कोणी म्हणते कृष्ण, कोणी म्हणते शिव, कोणी म्हणते ब्रह्म, अशी त्यांनी भूमिका मांडली होती. 


1831 : बॅ. विठ्ठलभाई पटेल यांचा जन्म


थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष बॅ. विठ्ठलभाई पटेल यांचा जन्म. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे ते ज्येष्ठ बंधू होते. मुंबई कायदेमंडळात त्यांनी 1916 साली प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात यावे, या उद्देशाने त्यांनी एक विधेयक मांडले होते. 1919 साली त्यांनी काळा कायदा म्हणून प्रसिद्ध झालेल्या रौलट अ‍ॅक्टोबर प्रखर टीका केली. मुंबई महानगरपालिका, मुंबई विधिमंडळ व काँग्रेस अशा तीन क्षेत्रांत जरी त्यांनी कार्य केले, तरी संसदपटू म्हणूनच ते सर्वत्र प्रसिद्ध होते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी विविध पातळीवर आपला सहभाग नोंदवला होता.



1883 : क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा यांचा जन्म


भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारक मदनलाल धिंग्रा यांचा आज जन्मदिवस. इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी सर विलियम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. या कृत्यासाठी ब्रिटीश सरकारने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. 


1898 :  एन्झो फेरारी यांचा जन्म


इटालियन ड्रायव्हर एन्झो फेरारी हे फेरारी रेस कार निर्माते आहेत. इटालियन मोटर रेसिंग ड्रायव्हर आणि उद्योजक, फेरारी ग्रँड प्रिक्स मोटर रेसिंग टीमचे संस्थापक आणि त्यानंतर फेरारी ऑटोमोबाईल मार्कचे संस्थापक होते. 


1914 : शायर आणि गीतकार जान निसार अख्तर


भारतातील 20 व्या शतकातील एक महत्त्वाचा उर्दू कवी, गीतकार आणि कवी आहेत. अख्तर साहेबांनी 1935-36 मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून उर्दूमध्ये सुवर्णपदक मिळवून एम.ए. केले. 1947 मध्ये देशाच्या फाळणीपूर्वी ते ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये उर्दूचे प्राध्यापक होते. 1976 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.


1926 : अभिनेत्री नलिनी जयवंत यांचा जन्म


बॉलिवूडमध्ये 1940-50 दशकातील हिंदी चित्रपटातील प्रामुख्याच्या अभिनेत्री नलिनी जयवंत यांचा जन्म दिवस. नलिनी जयवंत यांचा जन्म १९२६ मध्ये मुंबई येथे झाला. त्यांच्यावर चित्रीत झालेली काही हिंदी गाणी लोकप्रिय ठरली होती. नलिनी जयवंत यांना 2005 मध्ये चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. 


1927: संगीतकार खय्याम यांचा जन्म.


आपल्या सुमधुर संगीताने हिंदी चित्रपटसृष्टीत काही दशके गाजवणारे संगीतकार मोहम्मद झहूर खय्याम हाश्मी ऊर्फ खय्याम यांचा आज जन्म दिवस. अभिनेता म्हणून कारकीर्द सुरू करण्यासाठी आलेले खय्याम यांनी संगीतकार म्हणून कारकीर्द गाजवली. उमराव जान, कभी कभी, त्रिशूल, थोडीसी बेवफाई, दिल ए नादान, नूरी, बाजार, हीर रांझा आदी चित्रपटांतील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गाजली. त्यांना केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


1933 : अभिनेत्री नवाब बानू ऊर्फ निम्मी यांचा जन्म.


निम्मी यांनी 50 ते 60 च्या दशकात चित्रपट सृष्टीत आपली एक वेगळी छाप सोडली होती. त्यांनी बरसात चित्रपटापासून कारकीर्दीस सुरुवात केली होती. राज कपूर यांनी नवाब बानू यांना निम्मी हे नाव बरसात चित्रपटाच्यावेळी दिले होते. पुढे हेच नाव कायम राहिले. 


1965 : गांबिया देशाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले


पश्चिम आफ्रिकेतील गांबिया हा देश सर्वात छोटा देश आहे. आफ्रिकेतील इतर देशांप्रमाणेच गांबिया अनेक दशके युरोपीयन राष्ट्रांची वसाहत होती. गांबिया हा देश राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य आहे. या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. 


1979 : सहारा वाळवंटात बर्फ पडला


सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.