18 February Headlines : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपूर आणि पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा महत्वाचा असल्याचे बोलले जात आहे. आज राज्यासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह असणार आहे. त्याशिवाय जाणून घ्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...


नव्या राज्यपालांचा शपथविधी


नवे राज्यपाल रमेश बैस यांचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे. हाय कोर्टाचे मुख्य न्यायाधीश त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. 


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपूर आणि पुणे दौऱ्यावर


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपूर आणि पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा महत्वाचा असल्याचे बोलले जात आहे. अमित शाह आज सकाळी साडे दहा वाजता दीक्षाभूमीला जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला वंदन करतील. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती भवन परिसरात जाऊन आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीला वंदन करतील. 


कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी दोन्ही बाजूंकडून प्रचार  


पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून प्रचाराला सुरूवात करण्यात येणार आहे. 


राज्यासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह 


आज राज्यासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह असणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पळशी झाली येथे महाशिवरत्रीनिमित्त आज श्री. शंकरगिरी महाराज महादेव मंदिरात मोठी यात्रा भरते. याठिकाणी सव्वा क्विंटलचा अनोखा रोडगा बनविण्याची 350 वर्षापासूनची प्रथा आहे. गव्हाचं पीठ,  ड्राय फ्रूट , दूध इत्यादी पदार्थांपासून बनविण्यात आलेल्या या मोठ्या रोडग्याला जमिनीत गाडून आग न लावता भाजतात व दुसऱ्या दिवशी या रोडग्याचा महाप्रसाद भाविकांना दिल्या जातो. हा रोडगा बनविताना बघण्यासाठी हजारो भाविक या ठिकाणी येतात. ही 350 वर्षांपासूनची परंपरा कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून खंडित झाली होती. त्यामुळे यावेळी या यात्रेत मोठी गर्दी उसळेल. 


 महाशिवरात्री निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्रंबकेश्वरच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार आहे, आज रात्रभर मंदिर भाविकांसाठी खुले रहाणार सकाळ पासून गर्दी वाढणार. महाशिवरात्री निमित्ताने उद्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताई ची यात्रा होत असते. यावेळी संत मुक्ताई मंदिर ते चांगदेव मंदिर अशी पालखी काढण्याची परंपरा आहे. लाखो भाविक या निमित्ताने दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात


महाशिवरात्री निमित्ताने अहमदनगरच्या डोंगरगण येथे महादेव मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असते. हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. या मंदिराच्या बाजूलाच सीता मातेचे स्नानगृह आहे. वनवासाच्या काळात श्रीरामांनी सीता मातेसाठी बाण मारून इथे स्नानगृह बनविल्याची आख्यायिका आहे. तिथेही भाविक गर्दी करत असतात


 महाशिवरात्रीनिमित्त बीड येथील ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरात मोठी गर्दी होते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने देशातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात मोठी गर्दी होत आहे.. महाशिवरात्रीला दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून आणि राज्या बाहेरून सुद्धा भाविक परळी मध्ये येत आहेत रात्रीपासूनच दर्शनासाठी लोक रांगेमध्ये लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 


 गोंदियातील प्रतापगड येथे यात्रा


गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे सुमारे 300 वर्षांपूर्वी गोंड राजाचे शासन होते. त्या काळातच याठिकाणी येथील डोंगर फोडून प्रतापगड हा किल्ला बांधण्यात आला होता. त्यानंतर बऱ्याच वर्षांपासून याठिकाणी शिवरात्रीला मोठी यात्रा भरते. येथे सर्व जाती- धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने येतात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दरवर्षी या ठिकाणी शिवरात्रीला उपस्थित राहतात. आजही नाना पटोले त्या ठिकाणी भेट देणार आहेत.