On This Day In History 12 February : इतिहासात 12 फेब्रुवारीच्या अनेक घटनांची नोंद आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 30 जानेवारी 1948 रोजी हत्या झाली आणि 12 फेब्रुवारी 1948 रोजी त्यांच्या मृत्यूच्या 13 व्या दिवशी त्यांच्या अस्थींचे देशाच्या विविध भागांतील पवित्र तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले. अलाहाबादमध्ये गंगेत अस्थिकलशाचे  विसर्जन करण्यात आले


1742: बाळाजी जनार्दन भानू उर्फ ‘नाना फडणवीस’ जन्मदिन 


बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस हे पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. त्यांचा जन्म साताऱ्याला झाला. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे त्यांना राज्यकारभाराचे शिक्षण मिळाले. वयाच्या 20व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती. पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंदेंच्या मदतीने त्यांनी पुन्हा रुळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचे वर्चस्व टिकवून ठेवले, पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. पुढे आजारपणात 13 मार्च 1800 रोजी त्यांचं निधन झालं. वाई येथे नाना फडणीसांचा वाडा आजही आहे. पुण्यातही नानावाडा आहे. नानावाड्यात काही वर्षांपूर्वीपर्यंत टिळक-आगरकर-चिपळूणकर यांनी स्थापन केलेली न्यू इंग्लिश स्कूल भरत होती. 


1809 : अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन (Abraham Lincoln) यांची जयंती 


अब्राहम लिंकन  हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होते, तसेच रिपब्लिकन पक्षाचा सदस्य असणारे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. ते अमेरिकन गृहयुद्धाच्या काळात राष्ट्राध्यक्ष होते. लिंकन यांचा गुलामगिरीची पद्धत प्रदेशांमध्ये नेण्यास विरोध होता. युद्धाच्या शेवटानंतर दक्षिणेच्या काही गुलामीचे पाठीराखे असणाऱ्या लोकांनी कट करून त्यांची हत्या केली. अब्राहम लिंकनचा जन्म फेब्रुवारी 12 फेब्रुवारी 1809 रोजी केंटकी राज्यातील हार्डिन काउंटीमधील सिंकिंग स्प्रिंग फार्मवरील एका खोलीच्या लाकडी खोपट्यात झाला. हा भाग त्या काळात अमेरिकन सरहद्दीवर मानला जात असे. त्यांचे नाव त्यांच्या आजोबांवरून ठेवण्यात आले होते. लिंकनने त्यांच्या राजकीय जीवनाचा प्रारंभ 1830 साली इलिनॉयच्या विधिमंडळाची निवडणूक लढून केला. या वेळी त्यांचे वय 23 वर्षाचे होते. याच काळात त्यांनी इलिनॉयच्या सैन्यदलातही कॅप्टन म्हणून सेवा केली. या काळात त्यांना युद्धास मात्र सामोरे जावे लागले नाही.अब्राहम लिंकनने 1834 पासून इलिनॉय राज्याच्या विधिमंडळात प्रतिनिधी म्हणून काम केले. याच काळामध्ये तो ते व्हिग पक्षाचा सभागृहातील नेता म्हणुनही काम केले. त्यांनी 1837 मध्ये गुलामगिरीच्या प्रथेचा विधिमंडळात पहिला निषेध केला. या वेळेस त्यांनी या प्रथेस अन्यायकारक व चुकीचे धोरण असे म्हटले. अब्राहम लिंकन यांची 14 एप्रिल 1865 रोजी हत्या करण्यात आली. 1862 मध्ये, लिंकन यांनी गुलामगिरी संपुष्टात आणण्यासाठी मुक्तीची घोषणा जारी केली होती. त्यांचा मारेकरी, जॉन विल्क्स बूथ, जो गुलामगिरीचा प्रखर वकिल होता त्याने वॉशिंग्टन डीसीच्या फोर्ड थिएटरमध्ये कोणत्याही अंगरक्षकांशिवाय नाटक पाहत असताना अब्राहम लिंकन यांना गोळ्या घातल्या. बूथ पाठीमागून वर आला आणि पॉइंट-ब्लँक रेंजने त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. 26 एप्रिल 1865 रोजी बूथने आत्मसमर्पण करण्यास नकार दिल्याने फेडरल सैन्याने गोळ्या घालून ठार केले.


1920: अभिनेते प्राण यांचा जन्मदिन (Pran)


अभिनेते प्राण (Pran) हे बॉलिवूडमधील लोकप्रिय खलनायकांपैकी एक होते. आज त्यांची जयंती आहे. प्राण हे असे खलनायक होते, जे चित्रपटातील नायकापेक्षा अधिक मानधन घेत होते. प्राण यांना बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक ‘खानदान’ या चित्रपटातून मिळाला होता. मात्र, भारत-पाक फाळणीपूर्वी त्यांनी ‘यमला जट’ या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. प्राण अभिनय करताना त्यात इतके तल्लीन होत की, ते पात्र पडद्यावर अक्षरशः जिवंत वाटायचे. प्राण यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1920 रोजी दिल्लीत झाला होता. फोटोग्राफीची आवड असलेल्या प्राण यांनी फाळणीपूर्वी काही पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम केले होते. लाहोरमध्येही त्यांनी 1942 ते 1946 या काळात तब्बल 22 चित्रपटांमध्ये काम केले. फाळणीनंतर ते पत्नी आणि मुलासह पाकिस्तानातून भारतात येऊन स्थायिक झाले. प्राण यांना बालपणापासून फोटोग्राफीची आवड होती. त्यांनी दिल्लीच्या 'ए दास अँड कंपनी'मध्ये इंटर्न म्हणूनही काम केले होते. पण फोटोग्राफी करत असताना त्यांना मनोरंजन विश्व खुणावत होते. त्यांनी पडद्यावर साकारलेला खलनायक इतका गाजायचा की, प्रेक्षकही वाहवा करायचे. यामुळेच ते चित्रपटांमधील नायकापेक्षा जास्त फी घेत, असे असेही बोलले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांनी डॉन चित्रपटासाठी अडीच लाख रुपये घेतले होते, तर प्राण यांनी तब्बल पाच लाख रुपये घेतले होते. निर्माते देखील त्यांना मागतील तितके मानधन द्यायचे. त्यांनी 'मधुमती', 'देवदास', 'दिल दिया दर्द लिया', 'डॉन', 'जंजीर', 'मुनीम जी', 'अमरदीप', 'मजबूर', 'दोस्ताना', 'नसीब', 'अमरदीप', ‘कालिया', 'अमर अकबर अँथनी'  या चित्रपटांत साकारलेली पात्र प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली होती. 1967मध्ये ‘उपकार’ या चित्रपटासाठी त्यांना ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता’ म्हणून फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता. 1997मध्ये त्यांना फिल्मफेयरच्या ‘लाईफटाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रपट सृष्टीतील अमुल्य योगदानाबद्दल त्यांना 2001मध्ये ‘पद्म भूषण’, तर, 2012मध्ये ‘दादासाहेब फाळके’ या भारतातील मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. तब्बल 400हून अधिक चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते प्राण यांचे 2013मध्ये वयाच्या 93व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.


1922: महात्मा गांधींनी काँग्रेस कार्यकारिणीला असहकार आंदोलन संपवण्यासाठी सहमत केले.1967: प्रसिद्ध गायक चित्रवीणा एन रविकिरण यांचा जन्म.


1981: भारतीय चित्रपट दिग्दर्शक शांताराम आठवले यांचे निधन.


2002: खुर्रमाबाद विमानतळावर उतरताना इराणचे विमान कोसळून 119 जणांचा मृत्यू झाला.


2002: अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्लचे अपहरण केल्याच्या संशयावरून पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी अहमद उमर शेख याला अटक केली.


2010: हरिद्वार महाकुंभात पहिल्या शाही स्नानात सुमारे 55 लाख भाविकांनी गंगेत स्नान केले.