मुंबई : भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा आहे. इतिहासात आजच्या दिवशी वाराणसी आणि पुणे या दोन महत्त्वाच्या विद्यापीठांची स्थापना करण्यात आली होती. तसेच नवी दिल्लीतील बांधकाम पूर्ण होऊन देशाच्या नव्या राजधानीचं काम आजपासून सुरू झालं. यासह इतर महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊया. 


1921 : काशी विद्यापीठाची स्थापना 


शिव प्रसाद गुप्ता आणि भगवान दास यांनी 1921 मध्ये वाराणसी काशी विद्यापीठाची स्थापना केली होती. आजच्याच दिवशी, 10 फेब्रुवारी 1921 रोजी महात्मा गांधी यांच्या हस्ते पायाभरणी समारंभ झाला होता. 1995 साली या विद्यापीठाचं महात्मा गांधी काशी विद्यापीठ (Mahatma Gandhi Kashi Vidyapith University) असं नामकरण करण्यात आले.  


1929 : जेआरडी टाटा पहिले भारतीय वैमानिक (Jehangir Ratanji Dadabhoy Tata)


आजच्याच दिवशी 1929 मध्ये  जहांगीर रतनजी दादाभाई टाटा म्हणजेच जे. आर. डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले. त्यांनी भारतात पहिल्यांदाच व्यावसायिक विमानसेवा सुरु केली होती. त्यांनी टाटा ग्रुपचे संचालक म्हणूनही काम पाहिलं. जेआरडी टाटा यांना 1957 मध्ये पद्म विभूषण, 1992 मध्ये भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी लोह उद्योग, इंजिनिअरिंग, हॉटल, एअरलाईन्स आणि अन्य उद्योगांमध्ये मोलाचं योगदान दिलं आहे.  


1931 : नवी दिल्ली भारताची राजधानी ( New Delhi became the capital of India)


इंग्रजांनी 1911 साली भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला हलवली. त्यानंतर 1911 ते 1931 या दरम्यान नवी दिल्लीचं बांधकाम सुरू होतं. 1931 साली हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आजच्याच दिवशी म्हणजे, 13 फेब्रुवारी 1931 रोजी दिल्लीला इंग्रजांनी आपली राजधानी म्हणून घोषणा केली. पश्चिम बंगालमध्ये क्रांतिकारी चळवळी सुरू झाल्यामुळे कोलकात्यावरुन दिल्लीला राजधानी हलवण्याचा निर्णय ब्रिटिशांनी घेतला होता.


1949 : पुणे विद्यापीठाची स्थापना (Savitribai Phule Pune University)


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना आजच्याच दिवशी 1949 मध्ये झाली होती. जुन्या मुंबई प्रांतातील मराठी भाषिक लोकांच्या सांस्कृतिक व शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यावेळी पुणे विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. सध्या या विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झाली आहे. जगभरातून शिक्षणासाठी लोक पुण्यात येतात.  पुणे विद्यापीठात सुमारे जवळपास सात लाख विद्यार्थी, 42 शैक्षणिक विभाग, 12 आंतरविद्याशाखा व केंद्र, 6 स्वायत्त यूनिट्स, 6 अन्य शैक्षणिक व सेवा यूनिट्स, 20 अध्यासने, 8 राष्ट्रीय व प्रादेशिक केंद्र आहेत. 696 संलग्न महाविद्यालये, 287 मान्यताप्राप्त व्यवस्थापन संस्था, 121 मान्यताप्राप्त संशोधन केंद्र विद्यापीठाशी संलग्न आहेत. डॉ. बाबासाहेब जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरु होते. 


1923 : टेक्सास टेक विद्यापीठाची स्थापना (Texas Tech University)


1970 : कुमार विश्वास यांचा वाढदिवस (Kumar Vishwas) 


प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1970 रोजी झाला. हिंदीमधील त्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत. त्यांनी आम आदमी पक्षातही राष्ट्रीय कार्यवाहक म्हणून काम पाहिलं आहे. 


2009 : पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्कार


पंडित भीमसेन जोशी यांना आजच्याच दिवशी, 2009 रोजी भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. भारतीय शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, अभंग, कन्नड, मराठी आणि हिंदी चित्रपटांतील अनेक गाण्यांचं त्यांनी पार्श्वगायन केले आहे.