मुंबई : आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपात पुन्हा 'नवे विरुद्ध जुने' असा सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण विधानसभेत आलेल्या आयारामांना दिलेला शब्द पाळायचा की पक्षातील जुन्या - जाणत्या नेत्यांचं पुनर्वसन करायचं असा प्रश्न भाजपसमोर निर्माण झाला आहे.


राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आल्यामुळे विधानपरिषद निवडणुकीची गणितं बदलली आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 105 जागा जिंकणाऱ्या भाजपला आता विधानपरिषद निवडणुकीत कमी जागांवर संधी मिळणार आहे. त्यामुळे या मोजक्या रिक्त जागांवर आपली वर्णी लागावी यासाठी भाजपमधल्या इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

येत्या 24 एप्रिलला विधानसभा सदस्यांद्वारे निवडून येणाऱ्या विधानपरिषदेच्या 9 सदस्यांची मुदत संपत आहे. यात विधानसभेचं पक्षीय बलाबल पाहता भाजप चार जागा निवडून येऊ शकतं. तर शिवसेना दोन, राष्ट्रवादी दोन आणि काँग्रेसला एक जागा सुटू शकते. यापैकी भाजपचे अरुण अडसड, स्मिता वाघ आणि पृथ्वीराज देशमुख यांच्या जागा रिक्त होणार आहेत. तसेच चौथ्या जागेसाठी भाजप मित्रपक्ष आणि अपक्षांची जुळवाजुळव करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भाजपच्या चार जागांसाठी विधानसभेत पराभूत झालेले किंवा उमेदवारी न मिळालेल्या 'जुन्या आणि नव्या' अशा दोन्ही इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.
कोणाच्या नावांची आहे चर्चा ?

जुने :
पंकजा मुंडे - भाजपचा आक्रमक ओबीसी चेहरा. विधानसभेत मोठ्या फरकाने पराभव झाल्यामुळे मराठवाड्यात पुन्हा ताकद देण्याचा प्रयत्न. मागील पाच वर्षे ग्रामविकास आणि महिला बाल कल्याण मंत्री म्हणून कामाचा अनुभव असल्यामुळे सरकारला कोंडीत पकडण्याची संधी.

राम शिंदे- ओबीसी धनगर चेहरा, माजी मंत्री आणि फडणवीसांचे जवळचे मानले जातात. रोहीत पवार यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर पुन्हा सभागृहात स्थान मिळाव यासाठी प्रयत्नशील

रोहीणी खडसे- एकनाथ खडसेंची नाराजी दुर करण्यासाठी त्यांच्या घरात एक पद देण्याचा विचार पक्षाचा आहे. विधानसेभेत पराभवानंतर राजकिय पुनर्वसनाचा प्रयत्न

चंद्रशेखर बावनकुळे - उमेदवारी नाकारल्यामुळे तेली समाजाने विधानसभा निवडणुकीत पाठ फिरवली. नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय. माजी मंत्री म्हणून प्रशासनावर चांगली पकड. आर्थिक पाठबळ असलेला विदर्भाचा महत्वाचा नेता.
नवे :
हर्षवर्धन पाटील - इंदापूर मधून पराभूत झाल्यानंतर भाजपात सक्रिय राहण्यासाठी विधानपरिषदेत वर्णी. उत्तम संसदपटू आणि संसदीय कामकाजाचा गाढा अभ्यास. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी सक्षम. पश्चिम महाराष्ट्रातील मोठा चेहरा.

रणजितसिंह मोहिते पाटील - लोकसभा निवडणुकीत भाजपात प्रवेश करून थेट शरद पवारांना शह दिला. मात्र अध्याप योग्य पुनर्वसन नाही. उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र. सोलापूर आणि आसपासच्या परिसरात चांगली संघटनात्मक बांधणी.

मुन्ना महाडिक - प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने भाजपात प्रवेश. लोकसभा आणि विधानसभेतील पराभवानंतर महाडिक यांच्या घरात एकही पद नाही. मात्र कोल्हापुरात कार्यकर्त्यांचं मोठं जाळं.

वैभव पिचड- अनपेक्षीत पराभवानंतर राजकीय पुनर्वसनासाठी प्रयत्नशील. मधुकर पिचड यांच्या नगर झालेली पिछेहाट दूर करण्यासाठी  त्यांना बळ देण्याचा प्रयत्न

BJP | भाजप मनसेसोबत युती करणार नाही, भाजपच्या राज्यस्तरीय शिबीरात विनोद तावडेंचं वक्तव्य | ABP Majha



संबंधित बातम्या :

'शिवाजीचे उदात्तीकरण : पडद्यामागचे वास्तव' पुस्तकाविरोधात भाजपची तक्रार

इंदोरीकर महाराजांचं समर्थन नाही, 'ते' वक्तव्य चुकीचंच : चंद्रकांत पाटील