सिंधुदुर्ग : तिलारी जलविद्युत प्रकल्पाच्या मागील क्षेत्रामध्ये वन्य जीव संवर्धनासाठी राखीव जंगल यासह इको टुरिझम निर्मिती प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा आढावा तसेच पर्यटन विकासाबाबत सव्वातीन तास बैठक घेतली.
जिल्ह्यातील विविध विषयांबाबत सविस्तर आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तिलारी प्रकल्प क्षेत्रात पर्यटन विकासासाठी वन संवर्धन राखीव करून पर्यटनाच्या सुविधा उभारण्याबाबत एकत्रित प्रस्ताव तयार करावा. एलईडी मासेमारी विरोधात येत्या अधिवेशनात राज्याचा कडक कायदा निर्माण केला जाईल. जिल्ह्यातील सर्व रिक्त पदांचा आढावा संबंधित विभागांनी घेऊन पदे भरण्याविषयीची कार्यवाही तातडीने सुरू करावी. खासगी वनांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे वनांची नोंद बदलता येत नाही. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारची भूमिका मांडण्यासाठी वरिष्ठ विधिज्ञ नियुक्त करण्यात येईल. आकारीपड प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सम प्रमाणात वाटणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी संबंधित प्रांताधिकाऱ्यांना आदेश द्यावेत आणि त्याचा आढावा घेऊन अहवाल सादर करावा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबुलायतदार गावकार प्रकरणी जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेल्या 658 हेक्टर जमिनीबाबत एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. जिल्ह्यात बांधण्यात येणारे धूप प्रतिबंधक बंधारे हे दगडी बांधण्यासाठी संबंधित विभागाने प्रस्ताव करावा. सागरी महामार्गाच्या काँक्रिटीकरणाऐवजी कमी खर्चात टिकाऊ रस्ते निर्मितीसाठी बॅच मिक्सचा वापर करावा. रेडी व आरोंदा बंदर पुन्हा शासनाकडे घेण्याबाबत विचार करण्यात येईल, पाणबुडी प्रकल्पाविषयी सकारात्मक विचार करू, जिल्ह्यात अद्ययावत असे क्रीडा संकुल उभारण्यात येईल. कवी मंगेश पाडगावकर यांच्यासह अन्य स्मारकांच्या उभारणीबाबत प्रस्ताव द्यावेत. त्यामध्ये त्या व्यक्तीविशेषांचा समावेश राहील याची काळजी घ्यावी. महिनाभरात पर्यटन विकास महामंडळाने जिल्ह्याचा परिपूर्ण पर्यटन अराखडा सादर करावा अशा विविध सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
राज्यात शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यत कर्ज माफी जाहीर करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर मच्छिमारांना कर्जमाफी देण्याबाबत राज्य शासन विचाराधीन आहे. अशा मच्छिमारांबाबत सर्वेक्षण करुन त्यांची वर्गवारी तयार करावी. मच्छिमारांचे कर्ज कशा प्रकारचे आहे व किती आहे, कोणत्या गटातील मच्छिमार या साठी पात्र ठरू शकतात याचा सविस्तर माहिती सादर करावी. याचा अभ्यास करून मच्छिमारांना कर्जमाफी जाहीर करू. सर्जेकोट, राजकोट, नवाबाग येथील जेटींची उभारणी करण्यासाठी मत्स्य विभागाने कार्यवाही पूर्ण करावी. मच्छिमारांच्या डिझेल अनुदानासाठी 5 कोटी 40 लाख रुपयांचा निधी लवकरच द्यावा अशा सूचनाही मुख्यमंत्रीनी दिल्या.
कणकवली येथील प्रस्तावीत ट्रामा केअर सेंटर लवकरच सुरू होईल, जिल्ह्यातील व्हायरॉलॉजी लॅब एप्रिलपर्यंत सुरू होईल, माकडतापाची नवी लस मिळण्याबाबत केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा. वेंगुर्ला येथील उप जिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण झाले आहे. एप्रिलमध्ये हे रुग्णालय सुरू होईल. कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयासाठी लागणारा निधी देण्याची व्यवस्था तातडीने करावी. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम राहण्यासाठी आरोग्य सचिवांनी योग्य ती दक्षता घ्यावी, अशा सूचनाही दिल्या.
जिल्ह्यातील अरुणा, नरडवे, सी वर्ल्ड सारखे रखडलेले प्रकल्प लवकरच मार्गी लावू असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सी वर्ल्ड सारख्या प्रकल्पांसाठी खासगी गुंतवणूकदार पुढे आल्यास त्यासाठी भांडवली अनुदान देऊन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवून प्रकल्प मार्गी लावण्यात येतील. काजू व फळ प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरण ठरवावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
संबंधित बातम्या :