पालघर : जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यातील आसे याठिकाणी शिक्षकी पेक्षाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका आश्रमशाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत शाळेच्या अधिक्षकानं घृणास्पद कृत्य केलं आहे. संशयीत आरोपीनं पीडित मुलीला घरकाम करण्यासाठी घरी बोलावून तिच्याशी अश्लील चाळे करत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. एवढंच नव्हे तर संबंधित प्रकार कोणालाही सांगितला तर तुझ्या घरच्यांना जीवे मारेल अशी धमकीही आरोपीनं पीडित मुलीला दिली आहे.
या प्रकरणी शाळेतील शिक्षिकेनं मोखाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर संशयीत आरोपी अधिक्षकाला अटक करण्यात आली आहे. योगेश अमरसिंग चव्हाण असं अटक केलेल्या नराधम आरोपीचं नाव आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास मोखाडा पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही आसे येथील महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेची विद्यार्थिनी आहे. तर आरोपी योगेश चव्हाण हा निवासी वसतिगृहाचा अधीक्षक म्हणून नोकरी करतो. 14 डिसेंबर रोजी आरोपीनं घरातील भांडी घासायची असल्याचं सांगून पीडित मुलीला आपल्या घरी बोलावलं होतं. पीडित मुलीनं घरातील भांडी धुतल्यानंतर फरशी पुसून घेत होती. यावेळी आरोपी अधिक्षक याठिकाणी आला. त्याने पीडितेला पाठिमागून आवळून पकडलं. तुझं कोणावर प्रेम आहे का? म्हणत तो पीडितेच्या अंगाला झटू लागला.
त्यानंतर आरोपी पीडितेला आपल्या बेडरूममध्ये घेऊन गेला. याठिकाणी आरोपीनं पीडित मुलीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना ठार मारेल, अशी धमकी आरोपीनं दिली.
दरम्यान शाळेतील एका महिला कर्मचाऱ्याने संबंधित सर्व प्रकार पाहिला आणि याची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर अधिक्षकाचे हे कांड उघडकीस आले. पोलिसांनी पोक्सो कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ews Reservation : ईडब्ल्यूएस आरक्षण उत्पन्नाची मर्यादा आठ लाख रुपये कायम, केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
- मेडिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय,ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी आरक्षण
- Nawab Malik : भाजपच्या बडा नेत्याकडून वानखेडेंना त्याच पदावर ठेवण्यासाठी लॉबिंग - मलिक