मुंबई : वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांची इंटरनेटवर बदनामी करण्यात येत आहे. मुस्लिम महिलांचे फोटो ऑनलाईन अॅपवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने देखील दखल घेतली आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार केली आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणीही केली आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत अशा घटनांचा निषेध केला आहे. तसेच महिला आयोग कार्यालयाने दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र सायबर विभागाला दिले आहेत.


याप्रकरणाची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे. त्यांनी ट्वीट करत दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सुल्ली डील नावाच्या ॲप वरून मुस्लिम महिलांचे फोटो, प्रोफाइल व त्यासमोर किंमत लिहून प्रसारित केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. समाजात तेढ निर्माण करून देशातील शांतता बिघडवायची आणि आपले राजकीय हेतू साध्य करण्याचे प्रयत्न काही लोक करत असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. तसेच असे ॲप तयार करून संकलित माहितीचा प्रसार करण्यासाठी मोफत व अनियंत्रित प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणाऱ्या 'गिटहब' विरुद्ध सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाने महाराष्ट्र सायबर विभागाला दिले आहेत. 


मागील काही दिवसांपासून घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने दिसून येते की, या सुल्ली डील ॲपवरून महिलांसंबंधीची माहिती विविध समाजमाध्यमांवरसुद्धा प्रसारित झाली आहे. त्यामुळे सर्व समाज माध्यमंवरून ती माहिती तत्काळ काढून टाकण्यात यावी, असेही निर्देश राज्य महिला आयोगाने दिले आहेत.


दिल्लीत एका महिलेने असे प्रसिद्ध केलेले फोटो ट्वीटरवर शेअर केले होते. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यानंतर या महिलेने दिल्ली पोलिसांमध्ये देखील तक्रार केली आहे. हाच मुद्दा प्रियंक चतुर्वेदी यांनी उचलून धरला आहे. त्यांनी मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच सायबर सेलकडे देखील त्यांनी तक्रार दाखल केली आहे. चुकीच्या पद्धतीने महिलांच्या फोटोंचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब  या अॅपवर टाकून त्यांची बदनामी केली जात आहे. याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. याप्रकरणातील काहीजण हे मुंबईचे असल्याचेही चतुर्वेदी यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांना याबाबत कोणताही तपास लागला नाही. ते याप्रकरणाचा छडा लावण्यात असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे मी मुंबई पोलिसांकडे याप्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: