कल्याण डोंबिवली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षण (OBC Reservation) रद्द झाल्यानंतर भाजप आक्रमक झाला आहे.  पुरेसे पुरावे आणि बाजू न मांडता आल्याने आरक्षण गेलं असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी (BJP Leader) केला आहे. तसेच 26 जूनला महाराष्ट्रात चक्का जाम (Maharashtra Chakka Jam Protest) आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. 


'लपून छपून टायर घेऊन या...चक्काजाम करा टायर कशासाठी आणला जातो हे सांगण्याची गरज नाही...चक्का जाम करण्यासाठी त्याचा वापर करा...' ही प्लॅनिंग आहे भाजपची. 26 तारखेला होणाऱ्या आंदोलनाची. भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उग्र आंदोलन कसे करावे याचे वादग्रस्त धडे देतानाचा एक व्हिडीओ समोर आलाय.  26 तारखेच्या आंदोलनासाठी भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतलं OBC आरक्षण अडचणीत का आलं?


26 तारखेला राज्यभरात भाजप कडून ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले जाणार आहे. कल्याण डोंबिवली सह अन्य भागात हे आंदोलन कशा प्रकारे केले जाईल यासाठी भाजपकडून एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात भाजप आमदार रविंद्र चव्हाण हे कार्यकर्त्यांना आंदेलन कसे करायचे हे सांगताना दिसून येत आहेत. सरकारचे या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी उग्र आंदोलन करण्याचे ते सांगत आहे. कार्यकर्त्यांना ते सांगत आहे की, लपून छपून टायर घेऊन या. चक्काजाम करा, टायर कशासाठी आणला जातो हे सांगण्याची गरज नाही. चक्का जाम करण्यासाठी त्याचा वापर करा असे चव्हाण या व्हि़डीओत सांगत आहेत.


सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण रद्द, 26 जूनला महाराष्ट्रात चक्का जाम, पंकजा मुंडेंचा इशारा


26 जूनला महाराष्ट्रात चक्का जाम 
राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण रद्द झालं असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. पुरेसे पुरावे आणि बाजू न मांडता आल्याने आरक्षण गेलं असल्याचा आरोप भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) यांनी केला होता. तसेच 26 जूनला महाराष्ट्रात चक्का जाम (Maharashtra Chakka Jam Protest) आंदोलन करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं होतं.  राज्यसरकार केंद्र सरकारला जनगणना देत नाही हे चुकीचं आहे, याचा जनगणनेशी संबंध नाही. वेळकाढूपणा काढणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी तसेच ओबीसींना आरक्षण मिळावे म्हणून संपूर्ण महाराष्ट्राभर 26 जूनला भाजप चक्का जाम आंदोलन करणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.