पुणे : राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण (OBC Reservation) रद्द झालं आहे. पुरेसे पुरावे आणि बाजू न मांडता आल्याने आरक्षण गेलं असल्याचा आरोप भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) यांनी केला आहे. तसेच 26 जूनला महाराष्ट्रात चक्का जाम (Maharashtra Chakka Jam Protest) आंदोलन करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं आहे. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांची एक बैठक झाली त्यानंतर ओबीसी समाजाची एक बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की,  राज्यसरकार केंद्र सरकारला जनगणना देत नाही हे चुकीचं आहे, याचा जनगणनेशी संबंध नाही. वेळकाढूपणा काढणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी तसेच ओबीसींना आरक्षण मिळावे म्हणून संपूर्ण महाराष्ट्राभर 26 जूनला भाजप चक्का जाम आंदोलन करणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. 


त्यांनी म्हटलं की, विधानसभा आणि मंत्री हा प्रश्न सोडवू शकतात.  ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होऊ देणार नाही.  आरक्षण जाण्यास केंद्र नाही तर राज्य जबाबदार आहे. राज्य केंद्राला जबाबदार धरत असेल तर राज्य सरकारचा अभ्यास कमी आहे, असंही त्या म्हणाल्या. 


आमदार प्रताप सरनाईक यांचा 'लेटरबॉम्ब' संदर्भात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, भाजप आणि शिवसेनेची अनेक वर्षांपासून युती राहिलेली आहे. या युतीसोबत अनेकांची ग्रोथ झालेली आहे. त्यामुळे साहजिक आहे, तशी भावना त्यांनी मांडली असेल. त्यात ते शिवसेनेचे आहेत, त्यांची ही भूमिका आहे. याचं मी स्वागत करते, शेवटी भाजप-शिवसेनेची अनेक वर्षांपासूनची युती आहे. भविष्यातील निर्णय त्या-त्यावेळी घेतले जातील, असंही त्या म्हणाल्या. 


शिवसेना आणि भाजप युतीबाबत काय म्हणाल्या पंकजा मुंडे


पंकजा मुंडे म्हणाल्या की,  मुख्यमंत्री आणि माझं वैयक्तिक नातं वेगळं आहे. ते यापुढेही राहील आणि राजकीय दृष्टीने मी ज्या पक्षात ती भूमिका ही कायम राहील. या दोन्ही गोष्टी एकावेळी असू शकतात. त्यामुळे भविष्याचं भाकीत मी  आत्ता करू शकणार नाही.  शिवसेना आणि भाजप युतीबाबत भाष्य करणं घाईच होईल, असं त्या म्हणाल्या.