Babanrao Taywade: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी तब्येत सांभाळावी, तब्येत सुदृढ राहिली तरंच ते मराठा समाजाच्या (Maratha Samaj) आरक्षणाचा लढा लढू शकतील असा मोलाचा सल्ला राष्ट्रीय ओबीसी महासंघानं (National OBC Federation) दिला आहे. सरकारला राज्य मागास वर्ग आयोगाच्या (State Backward Classes Commission) अहवालावर चर्चा करून विधिमंडळाचा विशेष अधिवेशन बोलावून निर्णय घेण्यासाठी काही कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी पूर्ण करणं आवश्यक आहे. हे सर्व घाईनं होऊ शकत नाही, हेदेखील मनोज जरांगे यांनी लक्षात घ्यावं, असं ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे (Dr. Babanrao Taywade) म्हणाले. 


वारंवार उपोषण केल्यामुळे आणि 27 जानेवारीचा विजयोत्सव साजरा केल्यानंतर, आता पुन्हा उपोषण केल्यामुळे महाराष्ट्रात संभ्रम पसरतोय. नेमकं सुरू काय आहे? नेमकं निर्णय काय होत आहेत? याबद्दल लोकांमध्ये संभ्रम असून हे योग्य नाही, असंही डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले. 


राज्य मागासवर्ग आयोगामधून चंद्रलाल मेश्राम यांना निष्काशीत करणं योग्य नसून निषेधार्ह आहे. जर कोणी सदस्य सलग तीन बैठकीमध्ये अनुपस्थित राहत असेल, तर आयोगाच्या अध्यक्षांना तसं निष्काशीत करण्याचा अधिकार असतो. मात्र, आयोगाचा एक सदस्य इतर सदस्यांशी सहमत नाही, त्याचे विचार वेगळे आहे, या कारणामुळे त्याला निष्काशीत करणं योग्य नसल्याचं तायवाडे म्हणाले. 


राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर केल्यानंतर मंत्रिमंडळात त्यावर चर्चा होईल. त्यानंतर विशेष अधिवेशनाची प्रक्रिया होईल. मात्र राज्य मागासवर्ग आयोग अवघ्या काही दिवसांमध्ये घाई गडबडीत एवढा मोठा सर्वेक्षण करत असेल, तर जातनिहाय गणनाही त्यांनी एका महिन्यात पूर्ण करावी, अशी कोपरखळीही तायवाडे यांनी राज्य मागासवर्ग आयोगानं केलेल्या सर्वेक्षणासंदर्भात मारली आहे.


जरांगेंच्या आंदोलनाचा पाचवा दिवस, प्रकृती खालावली 


मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. अन्न पाणी न घेतल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. गावकरी, मित्र सहकाऱ्यांकडून वारंवार पाणी पिण्याचा आणि उपचार घेण्याचा आग्रह होतोय. सोमवारी रात्री जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी देखील जरांगे यांना पाणी घेण्याची विनंती केली. मात्र, सगेसोयरे अध्यादेशाची अमलबजावणी होईपर्यंत आपण उपोषण सोडणार नसून, पाणी देखील पिणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस, प्रकृती खालावली, नाकातून रक्तस्त्राव