Rajya Sabha Election 2024 : राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिलाय. राज्यसभा उमेदवारी (rajya sabha) अर्ज भरण्याची 15 फेब्रुवारी ही अखेरची तारीख आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या (maharshtra politics) सहा जागा आहेत, या सर्व जागांवर उमेदवारी देण्याचा प्लॅन महायुतीने आखला आहे. त्यासाठी उमेदवार कोणते? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. वर्षा निवासस्थानावर त्यासाठी महायुतीच्या दिग्गज नेत्यांमध्ये मध्यरात्री खलबतं झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये वर्षा निवासस्थानावर बैठक झाली. मध्यरात्री एक वाजेपर्यंत महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. तब्बल अडीच तास त्यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत राज्यसभेच्या उमेदवार निश्चित झाल्याची चर्चा आहे. आज महायुतीकडून उमेदवाराची यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
अशोक चव्हाणांमुळे राज्यसभेची गणित बदललं -
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यामुळे राज्यातील राज्यसभेचं गणित बदललं आहे. भाजप राज्यसभेसाठी चार उमेदवार देण्याची तयारी करत आहे. त्याशिवाय अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे यांना प्रत्येकी एक एक जागा मिळणार आहे. महाविकास आघाडीला राज्यसभेत एकही जागा मिळण्याची शक्यता नाही. आज महायुतीच्या उमेदवाराची यादी समोर येण्याची शक्यता आहे.
काँग्रेस आमदारांच्या मतांकडे लक्ष
दरम्यान, मागील निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस आमदार क्रॉस वोटिंग करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्षांतरबंदी कायद्यामुळे काँग्रेसच्या आमदारांना भाजपमध्ये सध्या तरी प्रवेश येणार नसल्याने क्रॉस वोटिंग करण्यासाठी भाजपने खेळी सुरु केल्याची चर्चा आहे. भाजप प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांना काही आमदारांनी समर्थन दिल्याने अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणं आमदारांना शक्य नाही. राज्यसभेच्या एका उमेदवाराला 40.9 चा कोठा ठरलेला आहे तो काँग्रेस पूर्ण करते. मात्र, तसे होणार का? याकडे लक्ष असेल. सहावी जागा ही महायुती जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे. महायुती सहापैकी पाच जागा जिंकत आहे.
सहा जागांसाठी मतांचं गणित काय?
महाराष्ट्र विधानसभेचे 288 सदस्य आहेत, त्यापैकी शिवसेनेचे सांगलीतील आटपाडीचे आमदार अनिल बाबर आणि भाजपचे अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन झालं आहे. अशोक चव्हाण यांचा राजीनामा आणि नागपूरचे काँग्रेस आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे.
- 284 आमदार राहिल्याने मतांचा कोटा राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 40.57 इतका आहे.
- भाजपकडे 104 आणि अन्य 13 अपक्ष आमदारांची मतं आहेत.त्यानुसार भाजपच्या 3 जागा सहजपणे निवडून येऊ शकतात.
- एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे 39 आमदार आणि 10 अपक्षांची मतं असल्याने एक जागा निवडून येऊ शकेल.
- काँग्रेसकडे 45 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यानुसार काँग्रेसची एक जागा निवडून येण्यास काहीही अडचण येणार नाही.
- पण अशोक चव्हाण भाजपमध्ये आमदार जास्त घेऊन आल्यास हे गणित मात्र बिघडू शकतं.