अहमदनगर : महाराष्ट्राचा प्राणी म्हणून शेकरूची ओळख. हा देखणा प्राणी दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालला असून यावर्षी मात्र शेकरू प्राण्याची संख्या दीडपट वाढली आहे. महाराष्ट्रात भीमाशंकर, कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, आजोबा डोंगररांगांमध्ये, माहुली, वासोटा, मेळघाट, ताडोबात शेकरू आढळतात. शेकरू हा अतिशय देखणा आहे. मात्र, तो झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दाट जंगलांत त्यांचे वास्तव्य असते. 


यावर्षी केलेल्या प्रगणनेत हरिश्चंद्रगड अभयारण्यात 97 शेकरू आढळले आहेत. यामुळे शेकरूंच्या संख्येत यंदा मागील वर्षीपेक्षा दीडपट वाढ झाल्याचे नुकत्याच झालेल्या शिरगणतीनुसार स्पष्ट झालं आहे. या अभयारण्यात आतापर्यंत शेकरूंची 396 घरटी आढळली आहेत. मात्र, त्यांची संख्या 97असून कोथळे 43, विहीर 20, लव्हाळी 17, पाचनई 14, कुमशेतमध्ये 3 शेकरू आहेत. ही संख्या वाढल्याने वन्यप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे. 


पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेकरू नवीन घरटी बनवतात. यामुळे शेकरूंची गणना मे मध्ये केली जाते. पहिल्या टप्प्यात शेकरूंची संख्या प्राप्त झाली आहे. हे सर्वेक्षण जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू असते. त्यामुळे अंतिम आकडा हा जूनमध्ये मिळेल, असे वन विभागाचे मत आहे. ही गणना 'जीपीएस' या तंत्राद्वारे केली जाते. यंदा केलेल्या गणनेत शेकरूंचा आकडा वाढू शकणार असून इतरत्र त्यांचा अधिवास आहे का, याचा अभ्यास करणार असल्याचे वनक्षेत्रपाल डी. डी.पडवळ यांनी सांगितले.


वजन दोन ते अडीच किलो, लांबी अडीच ते तीन फूट असलेल्या शेकरूंची डोळे गुंजीसारखे लाल असतात. त्याला मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांब शेपूट असते. शेकरू वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते. एक शेकरू झाडाच्या बारीक फांद्यावर सहा ते आठ घरटी तयार करते. ते 15 ते 20 फुटांची लांब उडी मारू शकते. विविध फळे व फुलांतील मध हे त्याचे खाद्य असते.


इतर महत्त्वाच्या बातम्या