पुणे : पुण्यातील मुठा नदीच्या पात्रात अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार पाहायला मिळाला आहे. नदीच्या कडेला असलेल्या झाडांना काळ्या बाहुल्या, बिबवे, लिंबू आणि ज्या व्यक्तीवर ती करणी करायची आहे अशा व्यक्तींचे फोटो ठोकण्यात आले आहेत. एक नाही तर अनेक झाडांना अशा प्रकारे या बाहुल्या ठोकण्यात आल्या ना अंधश्रद्धेचा हा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.
झाडांना ठोकण्यात आलेल्या काळ्या बाहुल्या, त्याच्या सोबत असलेले बिबवे, लिंबू आणि ज्या व्यक्तीवरती करणी करायची आहे त्या व्यक्तीची फोटोसहीत खडानखडा घेण्यात आली आहे. अंधश्रद्धेचा हा अघोरी प्रकार मध्यवर्ती पुण्यात सुरू आहे. फक्त एका झाडाला नाही तर इथल्या अनेक झाडांना अशा काळ्या बाहुल्या खोचण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या विरुद्ध बाजूला या बाहुल्या खोचण्यात आल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्यांच्या नजरेला त्या पडत नाहीत. परंतु थोडसं पुढे येऊन पाहिलं तर इथं हा अंधश्रद्धेचा बाजार भरल्याचं दिसून येतंय.
पुण्यातील मुठा नदी पात्रातील नारायण पेठ आणि डेक्कन यांना जोडणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या झाडांना या काळ्या बाहुल्या दाभणांच्या साह्याने ठोकण्यात आल्या आहेच. त्यासोबत काळे बिबवे, लिंबू आणि काही मजकूर लिहिला आहे. आपल्याला ज्या व्यक्तीवरती करणी करायची आहे. त्या व्यक्तीचा फोटो इथं खोचल्याच दिसतय. फोटोमधील व्यक्तीचा चेहरा दिसत नाही. परंतु हा करणीचा प्रकार आहे हे उघड आहे. महत्त्वाची बाब म्हणजे इथून काही अंतरावरतीच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली होती आणि तिथून काही अंतरावरतीच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यालय देखील आहे. आणि असं असताना हा इथं हा दुर्दैवी प्रकार होतोय.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकारावरती जोरदार आक्षेप घेतलाय. समितीच्या मते हा अघोरी प्रकार फक्त या एकाच ठिकाणी घडत नाही. तर पुण्यात अनेक झाडांना अशा काळ्या बाहुल्या खोचल्याचं दिसून येतय. राजरोसपणे हा प्रकार सुरू असेल तर अघोरी विद्या विरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेले पोलिस काय करतायत असा प्रश्न उपस्थित होतोय.
अंधश्रद्धेचा निपटारा व्हावा, लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यासह अनेकांनी आपले आयुष्य वाचलं. पण समाजात या अंधश्रद्धा किती खोलवर रुजल्यात हे यातुन दिसून येतंय. अशा प्रकारांना वेळीच आवर नाही घातला तर नरबळींचे प्रकारही घडतात असं अंनिसनं म्हटलंय. या काळ्या बाहुल्यांचा आकार आणि खोचण्याची पद्धत पाहता हा सगळा प्रकार कोणीतरी एकच व्यक्ती करत असावी अशी शक्यता आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तींवरती करणी करण्यात आली आहे त्या व्यक्तीची नाव आणि फोटोसह सगळी माहिती या झाडांना मजकुराच्या स्वरूपात टोचण्यात आली आहे.त्यामुळ पोलिसांनी या माहितीच्या आधारे तपास करून अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या बाबाला बेड्या ठोकण्याची गरज आहे.