Government Libraries Will Be Digital Soon : वाचन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आता पुस्तके वाचण्यासाठी प्रत्यक्ष ग्रंथालयात जाण्याची गरज नाही. आता मोबाईल, लॅपटॉप, बुक रीडर वरून ऑनलाईन कोणतंही पुस्तक केव्हाही कुठेही त्यांना वाचता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने काढलेल्या नव्या शासन आदेशानुसार आता शासकीय विभागीय रत्नागिरी येथील ग्रंथालय हे आधुनिक आणि डिजिटल होणार आहे. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी शासकीय ग्रंथालय आधुनिक डिजिटल करण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता शासकीय विभागीय ग्रंथालयांमध्ये उपलब्ध ग्रंथ साहित्य पुस्तके हे मोबाईल ॲप मधून देखील वाचकांना वाचता येणार आहे. हे सर्व करण्यासाठी या शासन निर्णयानुसार शासनाने निधी देखील उपलब्ध करून दिला आहे. 


ग्रंथालयात जाऊन आपण एक किंवा दोन पुस्तके घेऊन ती सोबत बाळगून वाचत होतो परंतु आता तसे न करता अनेक पुस्तके वाचकांना केव्हाही आणि कुठेही गरज असेल तेव्हा तसेच वेळ असेल तेव्हा आपल्या आता मोबाईलवर ऑनलाइन वाचता येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागने 25 मे 2022 रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार शासकीय विभागीय ग्रंथालय रत्नागिरी या कार्यालयाचे आधुनिकीकरण आणि डिजिटलायझेशन करण्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

 

शासनाचे हे पाऊल निश्चितच वाचकांसाठी अतिशय महत्वाचं ठरणार आहे. आजकाल कालबाह्य वाटायला लागणारी ग्रंथालयांचे स्वरूप नव्या काळानुसार नवीन पिढीला साजेसं असे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. बदलत्या काळानुसार पुस्तके आणि ग्रंथालय टिकून राहण्यासाठी ही बाब अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

 

राष्ट्रीय स्तरावर या अगोदरच नॅशनल डिजिटल लायब्ररी हे पोर्टल उपलब्ध आहे. यावर देखील आपण अनेक पुस्तके वाचू शकतो. परंतु मराठी पुस्तके या पोर्टलवर पाहिजे तितक्या प्रमाणात उपलब्ध नाही. मात्र अशाच प्रकारे महाराष्ट्रातील सर्व शासकीय ग्रंथालयांमधील सर्व पुस्तके डिजिटल स्वरुपात उपलब्ध झाली तर ती पुस्तके देखील चिरकाल टिकतील आणि वाचकांना ही पुस्तकं केव्हाही, कोठेही डिजिटल स्वरूपात वाचता येतील. तसेच स्पर्धा परीक्षा विषयक ई-बुक्स असतील, ग्रंथालय वाचकांना ग्रंथालयातून आणि घरून अमर्याद वापराची सोय असेल, असे वाचन प्रेमी उत्कर्ष पाटील यांनी या निर्णयाबद्दल बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

रत्नागिरी येथील ग्रंथालय असं होणार आधुनिक आणि डिजिटल


  • ग्रंथालयात येऊन जर वाचकांना पुस्तके वाचायचे असतील तर त्यासाठीची सोयही करण्यात आली आहे.

  • यामध्ये 10.1 इंची ई-बुक रीडर अँड्रॉइड टॅब अशी 20 टॅब ग्रंथालयांमध्ये वाचकांसाठी उपलब्ध असतील.

  • मुलांसाठी यामध्ये डिजिटल ग्रंथालय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

  • यामध्ये विज्ञान विषयक व्हिडिओज मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत असतील विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक ई-बुक्स देखील असतील. 

  • मराठी e-books असतील बालभारती आणि एनसीआरटी मोफत ई-बुक्स सदर ग्रंथालयांमध्ये उपलब्ध होणार आहे.

  • शिष्यवृत्तीसाठी ई-बुक्स देखील ग्रंथालयात उपलब्ध असतील.

  • लहान मुलांसाठी देखील ई बुक्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

  • हे सर्व उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने रत्नागिरी येथील शासकीय ग्रंथालयाला निधी उपलब्ध करून दिला आहे.

  • यानंतर पुढे देखील काही शासकीय ग्रंथालय डिजिटल आणि आधुनिकरण करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.