अकोला : वारी... महाराष्ट्रातील प्रत्येक वारकऱ्यासाठी आस्था, प्रेम, भावना आणि आपुलकीचा विषय. 'पंढरीच्या वारी'ला हजारो वर्षांची परंपरा आहे. मात्र, या वर्षी कोरोनाच्या संकटानं 'वारी'च्या आनंदावर विरजण घातलं आहे. हजारो वर्षांचा हा महाराष्ट्राचा 'लोकत्सव' इतिहासात पहिल्यांदा वारकऱ्यांच्या गर्दीविना सुना-सुना भासणार आहे. मात्र, सरकारनं महाराष्ट्राचा हा बहूमोल वारसा कोरोना संकटातही टिकून रहावा म्हणून काही निर्णय घेतले आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या याच निर्णयाविरोधात रुक्मिणीचं माहेर असलेल्या विदर्भात पडसाद उमटतांना दिसत आहे.


कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं केवळ पाच पालख्यांना पंढरपुरला प्रतिकात्मक रुपात जाण्याची परवानगी दिली आहे. या पाच पालख्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पालख्यांचा समावेश आहे. मात्र, विठ्ठलाचं 'सासर' आणि रुक्मिणीचं 'माहेर' असलेल्या विदर्भातील एकाही पालखीचा यामध्ये समावेश नाही. विशेष म्हणजे रुक्मिणीचं माहेर असलेल्या अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील ऐतिहासिक पालखीलाही सरकारनं पंढरपुरात जाणाऱ्या पालख्यांमध्ये स्थान दिलेलं नाही. त्यामुळे रुक्मिणी संस्थानच्या 425 वर्षांच्या पालखीची पंरपरा यावेळी पहिल्यांदा खंडीत होणार आहे. त्यामुळे वारकरी नाराज आहेत.


माहेरची महाराष्ट्रातील पहिली पालखी


कौंडण्यपुरच्या रुक्‍मिणी मातेच्या पालखीला 425 वर्षांचा इतिहास आहे. रुक्‍मिणी मातेच्या माहेरून निघालेली ही महाराष्ट्रातील पहिली पालखी आहे. रुक्मिणी मातेच्या माहेरहून पंढरपुरातील मूर्तिला दरवर्षी साडीचोळी, नैवद्य चढविण्यात येतो. रुक्‍मिणी मातेला साडीचोळी देऊन तिची बोळवण करण्यात येते आणि त्यानंतर आई रुक्‍मिणी मातेच्या पादुका भगवंतांच्या चरणाजवळ नेण्यात येतात. त्यामुळे सव्वाचार शतकांच्या काळात प्रथमच आषाढीला रुक्मिणीमाता आपल्या हक्काच्या 'माहेरच्या साडी'पासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


विदर्भातून पंढरपुरला आषाढी वारीसाठी 140 लहान-मोठ्या दिंड्या आणि पालख्या जातात. यामधील मोठी परंपरा असलेल्या सात पालख्या मानाच्या समजल्या जातात. या पालख्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातील माधान येथील प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज पालखी, कौंडण्यपूर येथील रुक्मिणी मातेची पालखी, बुलडाणा जिल्ह्यातील शेगावच्या गजानन महाराजांची पालखी, अकोला जिल्ह्यातील अकोली जहांगीर येथील संत भास्कर महाराज पालखी, अकोटची संत वासुदेव महाराज पालखी, अकोट येथीलच नरसिंग महाराज पालखी आदी पालख्यांचा समावेश आहे.

मात्र, पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीला विदर्भातील एकाही पालखीप्रमुख आणि वारकरी प्रतिनिधीला बोलविण्यात आलं नसल्याचा आरोप विदर्भातील प्रमुख पालख्यांनी केला आहे. याच बैठकीत फक्त मानाच्या पाच पालख्यांना आषाढीला पंढरपुरात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. या पाच मानाच्या पालख्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पालख्यांचा समावेश आहे. मात्र, विदर्भातील एकाही पालखीचा समावेश यात नसल्यानं विदर्भातील वारकरी नाराज झाले आहेत.


विदर्भातील प्रमुख पालख्या आणि जिल्हे :


प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज पालखी, माधान, अमरावती.
रूक्मिणी संस्थान पालखी, कौंडण्यपूर, अमरावती
गजानन महाराजांची पालखी, शेगाव, बुलडाणा
संत गुलाबबाबा पालखी, काटेल, बुलडाणा
संत सोनाजी महाराज संस्थान पालखी, सोनाळा, बुलडाणा
संत सखाराम महाराज पालखी, इलोरा, बुलडाणा.
संत भास्कर महाराज पालखी, अकोली जहाँगीर, अकोला.
संत वासुदेव महाराज पालखी, अकोट, अकोला
नरसिंग महाराज पालखी, अकोट, अकोला.
संत शिवराम महाराज पालखी, वरूर जऊळका, अकोला.
भवसागर ट्रस्ट पालखी, अकोला.


सरकारच्या नियमांचं पालन करीत वारी करू : वारकरी


यासंदर्भात विदर्भातील सर्वच पालखी प्रमुखांनी प्रतिकात्मक स्वरूपात वारी करू देण्याची सरकारला विनंती केली आहे. सरकारनं परवानगी दिल्यास 'सोशल डिस्टन्सिंग'च्या नियमांचं पालन करून आपण पालखी काढू असं अनेक पालख्यांच्या विश्वस्तांनी सरकारला लेखी सांगितल आहे.


शेकडो वर्षाच्या परंपरेचा विचार व्हावा 


शासनाने विदर्भातील वारकऱ्यांची शेकडो वर्षांची परंपरा लक्षात घेण्याची विनंती वारकऱ्यांनी सरकारला केली आहे. विदर्भातील कौंडण्यपूरच्या रुक्मिणी माता संस्थान, चांदूरबाजारचं संत श्री गुलाबराव महाराज भक्तीधाम, अकोटच्या संत भास्कर महाराज संस्थान, संत वासुदेव महाराज संस्थान, वरूर जऊळका येथील संत शिवराम महाराज संस्थान या पाच पालख्यांचा पंढरपुरला जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी युवा विश्व वारकरी सेनेनं केली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन पाच पालख्यांतील फक्त प्रत्येकी 25 वारकरी वारी पूर्ण करतील, असं आश्वासन त्यांनी सरकारला दिलं आहे. शासनाने जर परवानगी दिली नाही तर विदर्भातील वारकरी पाच पालख्यांमधील पादुका स्वत:च्या वाहनाने पंढरपुरला आणतील, असा इशारा युवा विश्व वारकरी सेनेच्या वतीने हभप गणेश महाराज शेटे यांनी सरकारला दिला आहे.


गजानन महाराज संस्थानच्या भूमिकेकडे लक्ष


विदर्भातील सर्व पालख्यांमध्ये नेहमीच शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीची चर्चा आणि कुतूहल असतं. 52 वर्षांची परंपरा असलेल्या या पालखीतील शिस्त आणि तरुण वारकऱ्यांच्या सहभागाची दरवर्षी मोठी चर्चा असते. दरवर्षी जवळपास 700 ते 800 लोक या पायदळ वारीत सहभागी असतात. मात्र, सरकारनं विदर्भातील पालख्यांसंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नसतांना, शेगाव संस्थानंन यावर कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे शेगाव संस्थानचा पंढरपुरच्या आषाढी वारीसंदर्भात काय पवित्रा आणि भूमिका असेल याकडे महाराष्ट्रासह विदर्भातील वारकरी समुदायाचं लक्षं लागलं आहे.


प्रकाश आंबेडकरांचा अजित पवारांवर वारकऱ्यांत दुजाभावाचा आरोप


या सर्व प्रकरणात आता वंचित बहुजन आघाडीनं उडी घेतली आहे. वारकऱ्यांमध्ये अजित पवार दुजाभाव करीत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पवारांच्या पुढाकारानं फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही वारकरी प्रतिनिधींनाच वारीची परवानगी देण्यात आल्याचं आंबेडकर म्हणाले आहेत. यात विदर्भाचा एकही प्रतिनिधी नसल्यानं यात विदर्भाला डावलल्यात आल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. हा अन्याय उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुढाकारानं झाल्याचं आंबेडकर म्हणालेत. त्यामूळे प्रातिनिधिक वारीसाठी विदर्भातील वारकऱ्यांनाही सरकारनं परवानगी द्यावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.


संबंधित बातम्या :




यंदा वारकऱ्यांविना आषाढी करण्यासाठी प्रशासन सज्ज, शहरातील मठ, धर्मशाळांची तपासणी


आषाढी वारी! यंदा पंढरीची वारी रद्द, पालखी पंढरपूरला कशी नेणार? आळंदी देवस्थानची प्रतिक्रिया