रायगड : आमच्याकडे सर्कसमध्ये प्राणी आहेत, विदुषकाची कमी आहे, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांना लगावला आहे. 'महाराष्ट्र सरकार हे तीन पक्षांचे सरकार आहे. असं वाटतं की सरकारच्या नावाखाली ‘सर्कस’ होत आहे. महाराष्ट्र शासनाकडे ज्या प्रकारची दूरदृष्टी असायला हवी, तीच दिसत नाही', अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेवर पवारांनी उत्तर दिलं. केंद्र सरकारची टीम येऊन पाहणी करणार असल्याचं मी ऐकलं आहे. महाराष्ट्रावरचं हे संकट आहे, त्यामुळे यात पक्ष, राजकारण बघू नये, असंही पवार म्हणाले.


'निसर्ग' चक्रीवादळाने कोकणात मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज रायगडमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. चक्रीवादळामुळे जे नुकसान झालं आहे ते खूप जास्त आहे. यावेळी दुहेरी संकट आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यापासून व्यवहार ठप्प आहेत, व्यवसाय थांबले आहेत. राज्य सरकारच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे, असं शरद पवारांनी म्हटलं.



सरकारने आता केलेली मदत अंतिम नाही. पंचनामे झाल्यावर काय मदत द्यायची हे ठरेल. आधी राज्यात पाठपुरवठा करु आणि आवश्यकता लागली तर दिल्लीत जाऊन देखील पाठपुरवठा करु, अशी ग्वाही शरद पवारांनी दिली. लवकर पंचनामे झाले पाहिजेत. केंद्र सरकारची टीम येऊन पाहणी करणार असल्याचं मी ऐकलं आहे. महाराष्ट्रावरचं हे संकट आहे, त्यामुळे यात पक्ष, राजकारण बघू नये. सगळ्यांनी पुढे येऊन गरजू लोकांना मदत केली पाहिजे, असं आवाहनही शरद पवारांनी केलं.



कोकणातील फळबाग शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नारळ, काजू , आंबा, सुपारी या फळबागा येथे आहेत. नारळ, सुपारीची पीकं उद्ध्वस्त झाली आहेत. उद्ध्वस्त झालेल्या नारळ बागा पुन्हा उभ्या राहायला पुढची 10 वर्ष जातील. शेती पूर्ववत करायला मोठा खर्च करावा लागेल. राज्य सरकार आणि केंद्राने मदत करण्यासाठी आवश्यक धोरण ठरवणे गरजेचं आहे. मत्स्य व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. आधीच कोरोना आणि वादळामुळे दुहेरी फटका बसल्याने त्यासाठी वेगळं पॅकेज देणं आवश्यक आहे, असं शरद पवारांनी म्हटलं.


केंद्र सरकार आणि राज्याला सांगून मदत घ्यावी लागेल. छोटे व्यावसायिक अडचणीत आहेत. पाच ते सहा दिवसाच्या आत वीज पुरवठा सुरळीत करणं आवश्यक आहे. टाटा, रिलायन्स, अदानी यांच्याशी संपर्क साधून त्यांची टीम याठिकाणी आली तर मदत होईल. अदानीमधून काहीजण मदतीला आले, असं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं. पाणीपुरवठा लवकर सुरू केला पाहिजे, असंही शरद पवार यांनी सांगितलं.


Sharad Pawar | शरद पवारांकडून म्हसळा गावातील मदरशाची पाहणी