यवतमाळ : चोरट्यांनी पेशंट बनून डॉक्टरला लुटल्याचा प्रकार यवतमाळच्या मोरथ येथे घडला आहे. डॉक्टरच्या गळ्याला चाकू लावून रोख रक्कम आणि घरातील दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मोरथ येथे डॉक्टरकडे पेशंट म्हणून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी डॉक्टरच्या गळ्याला चाकू लावत नगदी रोकड आणि डॉक्टरांच्या पत्नीच्या अंगावरील मौल्यवान दागिणे लंपास केले. मदन चक्करवार असं डॉक्टरचे नाव आहे.
डॉ. मदन चक्करवार सोमवारी आपल्या कुटुंबासह घरात नेहमीप्रमाने झोपले होते. त्यावेळी दोन अज्ञात इसमांनी तब्येत ठीक नसल्याचे कारण देत डॉक्टरांना आवाज दिला आणि उपचार करण्यासाठी विनंती केली. डॉ. चक्करवार यांनी घराचा दरवाजा उघडताच दोन्ही इसमांनी घरात प्रवेश केला. काही कळायच्या आत त्यांनी घरातील लाईट बंद करून डॉ. चक्करवार यांच्या गळ्याला चाकू लावून पैसे देण्यास सांगितले.
दरम्यान घाबरलेल्या डॉक्टरांच्या पत्नीने जवळ असलेले 10 हजार रुपये काढून दिले. तर जवळपास 30 हजार किमतीचं अंगावरील सोन्याचं मंगळसूत्र असा 40 हजारांचा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला. त्यानंतर डॉ. चक्करवार आणि त्यांच्या पत्नीने घराबाहेर येत आरडाओरड केला. परंतु चोरटे तोपर्यंत पळून गेले होते.
डॉ. मदन चक्करवार यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन अज्ञान चोरट्याविरुद्ध महागाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महागाव पोलीस करीत आहेत.