उस्मानाबाद : सरकारने केलेल्या दूधदरवाढीच्या घोषणेला आठवडा उलटला आहे. तरीही शेतकऱ्यांना दूधासाठी 25 रुपये प्रतीलिटरचा भाव मिळत नसल्याचं ‘एबीपी माझा’च्या पडताळणीत समोर आलं आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दूधदरवाढीसाठी केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने दूध संघांना 25 रुपये प्रतिलिटर या दराने दूध खरेदी करण्याचे आदेश दिले. पण राज्य सरकारने आम्हाला कोणताही आदेश दिलेला नाही, असा दावा दूध संघानी केला आहे.

सरकारने दूधसंघांना दिलेल्या आदेशाला एक आठवडा पूर्ण झाला. या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने सरकारच्या या निर्णयाची कितपत अंमलबजावणी झाली, याची पडताळणी केली. यामध्ये दूध संघ शेतकऱ्यांकडून आजही कमी दरातच दूधखरेदी करत असल्याचं समोर आलं आहे.

राजू शेट्टींच्या आंदोलनाआधी गायीच्या दुधाला 22 रुपये प्रतिलिटर असा भाव मिळत होता. आंदोलनानंतर अजून एकाही शेतकऱ्याला 25 रुपये दुधाचा दर मिळालेलाच नाही. उलट आज दुधाचे दर दोन रुपयांनी कमी झाले आहेत.

सध्या दूध संघ शेतकऱ्यांकडून 15 ते 20 रुपयांच्या भावाने दुधाची खरेदी करत आहेत. त्यामुळे राजू शेट्टींचे आंदोलन आणि राज्य सरकारच्या निर्णयावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

दरम्यान, दूधदरात वाढ करण्यात यावी, अशी मागणी करत राजू शेट्टींनी राज्यभर मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनात शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारच्या निषेध केला. तसंच मुंबई, पुण्यासारख्या शहरांना होणारा दूधपुरवठा रोखण्याचाही प्रयत्न झाला.

आठवडाभर सुरु असलेल्या आंदोलनानंतर दूध संघांना 25 रुपये प्रतीलिटर या भावाने दूधखरेदी करण्याचे आदेश दिल्याचं सरकारने म्हटलं होतं.