परमबीर सिंहांसोबत अनेक आयपीएस अधिकाऱ्यांची बदली : सूत्र
एबीपी माझा वेब टीम | 29 Jul 2018 10:36 AM (IST)
ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची महाराष्ट्राच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
मुंबई : राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची महाराष्ट्राच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह यांच्या पदाची सूत्रं सध्याचे भ्रष्टाचारविरोधी पथकाचे संचालक विवेक फणसाळकर घेऊ शकतात. म्हणजेच फणसाळकर ठाण्याचे नवे पोलिस आयुक्त होऊ शकतात. रजनीश सेठ यांनी भ्रष्टाचारविरोधी पथकाचं संचालकपद स्वीकारावं अशी सरकारची इच्छा आहे, मात्र सेठ यांनी नकार दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे फणसाळकर सध्या भूषवत असलेल्या भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या संचालकपदी पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला किंवा भ्रष्टाचारविरोधी पथकाचे अतिरिक्त महासंचालक बिपीन कुमार सिंग यांची नियुक्ती होऊ शकते. नागपूरचे पोलिस आयुक्त के व्यंकटेश यांची पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी बदली होण्याची चिन्हं आहेत. अतिरिक्त पोलिस महासंचालक (तुरुंग) भूषण उपाध्याय नागपूरच्या पोलिस आयुक्तपदी रुजू होऊ शकतात. राज्याचे सीआयडी प्रमुख संजय कुमार यांना नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्र दिली जाण्याचे संकेत आहेत. एकूण 124 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली आणि बढती झाल्याची माहिती आहे.