Navneet Rana On Sanjay Raut : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी येणाऱ्या राणा दाम्पत्याने शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत म्हणजे फक्त पोपट आहेत. त्यांना मिरची दिली की ते शांत बसतील, अशी टीका खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
अमरावतीहून मुंबईत पोहोचलेल्या राणा दाम्पत्याने आज पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर टिकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत यांना मी पोपट म्हणते, कारण ते दररोज सकाळी उठून पत्रकारांशी बोलतात. त्यांना मिरची दिली की ते शांत बसतील, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे. तर आमदार रवी राणा यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
"आम्हाला रोखण्यासाठी संजय राऊत यांनी मातोश्री येथून शिवसैनिक आमरावतीला पाठवले आहेत. आम्हाला रोखण्यासाठी नागरपूरवरून शिवसैनिक पाठवण्याची वेळ शिवसेनेवर आली ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आम्ही मुंबईत येणार म्हटल्यानंतर संजय राऊत यांनी बैठक घेतली आणि शिवसैनिक अमरावतीला पाठवले, असा आरोप रवी राणा यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.
दरम्यान, मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी येणाऱ्या राणा दाम्पत्याचा संजय राऊत यांनी बंटी आणि बबली असा उल्लेख केला आहे. तसेच, हनुमान चालिसा आणि रामजन्मोत्सव साजरा करणं हे धार्मिक आणि आस्थेचे विषय आहेत. पण याचा स्टंट केल्याची टीका नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर संजय राऊत यांनी केली आहे. हिंदुत्ववादी मित्राच्या पाठीत खंजीर खुपसल्यामुळेच भाजपवर ही वेळ आली, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा देणाऱ्या राणा दाम्पत्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. "बंटी आणि बबली मुंबईत पोहोचले असतील, तर आम्हाला काहीच हरकत नाही. ही स्टंटबाजी आहे, हे फिल्मी लोक आहे. स्टंटबाजी किंवा मार्केटिंग करणं त्यांचं काम आहे. आता भाजपला आपल्या मार्केटिंगसाठी अशा लोकांची गरज भासत आहे. हिंदुत्वाची मार्केटिंग करण्याची गरज नाही. आम्हाला माहीत आहे हिंदुत्व काय आहे. रामजन्मोत्सव किंवा हनुमान चालिसा या स्टंट करण्याच्या गोष्टी नाहीत. या श्रद्धा, भावनेच्या गोष्टी आहेत. पण यांना स्टंटच करायच्या असतील, तर करु द्या. आता त्यांना कळेल मुंबई काय आहे.", असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
हनुमान चालिसा पठण करण्यावर राणा दाम्पत्य ठाम
दरम्यान, कितीही विरोध झाला तरी उद्या मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जाणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले आहे. आम्हाला होणाऱ्या विरोधाची पर्वा न करता आम्ही हनुमान चालिसा वाचणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिलेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दाम्पत्याने अमरावती पोलिसांना गुंगारा देत मुंबई गाठली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. त्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांनी पत्रकार परिषद घेत मातोश्रीवर निर्धार व्यक्त केला. यावेळी रवी राणा यांनी शिवसेनेवर टीका केली. यावेळी त्यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्यावर ठाम असल्याचे सांगितले.
महत्वाच्या बातम्या