पंढरपूर : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी एसटी बसने आषाढी यात्रेला पालखी सोहळे आणावे लागल्यानंतर यंदा मात्र पायी पालखी सोहळ्यासाठी वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. कोरोनाचे निर्बंध चालतील मात्र बंदी नको, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे. उद्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे देहू, आळंदी आणि इतर मानाच्या सात पालखी सोहळा संस्थांशी चर्चा करणार असून यातून मार्ग निघेल अशी वारकरी संप्रदायाला अपेक्षा आहे.
यंदा 20 जुलै रोजी आषाढी एकादशी असून 1 जुलै रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तर 2 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान आहे. मात्र, अजूनही राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसल्याने मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. यात सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात देखील कोरोनाची साथ असल्याने यंदा आषाढी यात्रा कशी घ्यायची हा पेच सरकारच्या पुढे आहे. यातच वारकरी संप्रदायाने यंदा अतिशय मर्यादित स्वरूपात वारकऱ्यांना पायी पालखी सोहळ्यासाठी परवानगी द्यावी, आम्ही कोरोनाचे सर्व नियम पाळून पायी पालखी सोहळा पंढरपूरपर्यंत आणू अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे.
पंढरपूरमध्ये आज प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी वारकरी प्रतिनिधींशी चर्चा केल्यावर पायी परवानगी देण्याची भूमिका वारकरी संप्रदायाने घेतल्याने यंदा आषाढी यात्रेला पुन्हा प्रशासन व वारकरी संप्रदाय असा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. आता उद्या मुख्यमंत्री याबाबत काय भूमिका घेतात याकडे वारकरी संप्रदायाचे लक्ष आहे. उत्तर प्रदेशमध्ये कुंभमेळ्या नंतर उद्भवलेली परिस्थिती ताजी असताना सहिष्णू वारकरी संप्रदाय कोरोनाचा धोका समोर असताना भूमिका मवाळ करणार की शासन ठाम भूमिका घेत निर्णय घेणार यावर आषाढीचे भवितव्य अवलंबून आहे.
यंदा आषाढी यात्रेसाठी असे आहे पालखी सोहळ्याचे नियोजन
उद्या शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील मानाच्या 9 पालखी सोहळा प्रमु , विश्वस्थ व मानकरी यांची पुणे येथे बैठक आयोजित केली आहे. यंदा आषाढी एकादशीचा सोहळा 20 जुलै 2021 रोजी साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी गतवर्षी राज्यातील संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत एकनाथ, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत चांगावटेश्वर व माता रुक्मिणी या मानाच्या 9 पालख्यांना एसटी बसने वन डे वारीला शासनाने परवानगी दिली होती.
आषाढी पालखी सोहळे 2021
(मानाचे 7 पालखी सोहळे आणि शासनाने वाढवलेले 2 असे एकूण 9 पालखी सोहळे वेळापत्रक)
1) रुक्मिणी देवी पालखी सोहळा, कौंडण्यपूर जि अमरावतीहून प्रस्थान 14 जून 2021 (शासनाने वाढवलेला)
2) आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखी सोहळा , कोथळी - मुक्ताईनगर जि. जळगावहून प्रस्थान 14 जून 2021
(मानाचे पालखी सोहळे)
3) श्री क्षेत्र श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान, त्र्यंबकेश्वरहुन 24 जून 2021 (मानाचे पालखी सोहळे)
4) संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रस्थान देहू येथून 1 जुलै 2021 (मानाचे पालखी सोहळे)
5) संत एकनाथ महाराज पालखी सोहळा प्रस्थान, पैठण येथून 1 जुलै 2021 (मानाचे पालखी सोहळे)
6) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, आळंदी येथून प्रस्थान 2 जुलै 2021 (मानाचे पालखी सोहळे)
7) संत सोपानकाका पालखी सोहळा, सासवड येथून प्रस्थान 6 जुलै 2021 (मानाचे पालखी सोहळे)
8) संत चांगावटेश्वर पालखी सोहळा, सासवड येथून प्रस्थान 6 जुलै 2021 (शासनाने वाढवलेला)
9) संत नामदेव महाराज पालखी सोहळा हा पंढरपूर येथून 19 जुलै रोजी सर्व संतांच्या स्वागताला इसबावी येथे येईल
(मानाचे पालखी सोहळे)