मुंबई : पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. मंत्रिमंडळ बैठकीआधी विधानभवतान काँग्रेस नेत्यांची ही बैठक पार पडली. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची ही महत्त्वाची बैठक पार पडली. पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आघाडीमध्ये मतभेद असल्याचं आता समोर आलं आहे. अशातच या बैठकीपूर्वी पदोन्नती आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयासंदर्भात नितीन राऊत यांनी एबीपी माझाशी खास बातचित केली. 


नितीन राऊत म्हणाले की, "आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. तत्पूर्वी काँग्रेस पक्षाची बैठक होईल. या बैठकीत जो निर्णय होईल, तो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाईल. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्यापूर्वी पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे आणि 7 मे रोजी काढण्यात आलेला जीआर रद्द झाला पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका असणार आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोलेही या बैठकीला उपस्थित राहतील. चर्चेतून जो निर्णय होईल त्यावरुन पुढची दिशा ठरवली जाईल."


"मी स्वतः अनुसूचित जाती विभागाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्यामुळे दलितांचे आणि मागसवर्गींयांचे प्रश्न यासाठी लढा देणं आणि न्याय मागणं हे माझं कर्तव्य आहे. परंतु, राज्यात सध्या जे घडतंय, 33 टक्के जनतेला आणि तेही मगासवर्गीय जनतेला वेठीस धरुन त्यांच्या ज्या हक्कांवर आणि अधिकारांवर गदा आणण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल, तर काँग्रेस पक्ष त्याचा विरोध निश्चितपणे करेल.", असं नितीन राऊत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, "विधी आणि न्याय विभागाकडे यासंदर्भातील फाईल पाठवण्यात आली आहे. आजच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा होईल. चर्चेअंती त्यातून काय निष्पन्न झालं यासंदर्भात आम्ही पुन्हा एकदा चर्चा करु."


पाहा व्हिडीओ : मंत्रिमंडळ बैठकीआधी काँग्रेसची बैठक, पदोन्नतीतील आरक्षणावरुन काँग्रेस आक्रमक ; नितीन राऊत म्हणतात...



पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. अशातच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काँग्रेसची आक्रमक भूमिका दिसेल, असं विचारलं असता, नितीन राऊत म्हणाले की, "आजची मंत्रिमंडळ बैठक होऊ द्या. मग तुम्हाला कळेल डॉ. नितीन राऊत काय करत आहेत ते."


दरम्यान, पदोन्नतीच्या मुद्यावर विधानभवनात काँग्रेसची बैठक सुरु आहे. बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीच्याआधी पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसची बैठक पार पडली. पदोन्नतीच्या मुद्यावर मंत्रिमंडळ बैठकीत काय भूमिका घ्यायची यावर चर्चा करण्यात आली. त्यामुळे आता मंत्रिमंडळ बैठकीत काँग्रेस आक्रमक पवित्रा घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.