वर्धा : देशात कोरोनानंतर ब्लॅक फंगसचा धोका वाढलाय. ब्लॅक फंगसच्या रुग्णसंख्येमध्ये भर पडत असताना त्याच्यावर मिळणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण होतोय. अशा वेळी वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सने ब्लॅक फंगसवरील उपयोगी Amphotericin B Emulsion या इंजेक्शनचे उत्पादन सुरु केलं असून सोमवारपासून त्याचं वितरण करणार असल्याचं स्पष्ट केलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नानंतर या कंपनीला या उत्पादनाची परवानगी मिळाली होती.
सध्या देशात ब्लॅक फंगसवरील इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. Amphotericin B Emulsion या इंजेक्शनचे उत्पादन आतापर्यंत देशात एकाच कंपनीकडून केलं जायचं. त्यामुळे बाजारात या इंजेक्शनची किंमत ही 7000 रुपये इतकी आहे. पण आता वर्ध्यात याचं उत्पादन सुरु झालं असून हे महागडं इंजेक्शन केवळ 1200 रुपयांना उपलब्ध होणार आहे.
कोविड काळात म्युकरमायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगस या आजाराचेही रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. या जीवघेण्या आजारावर प्रभावी म्हणून अम्फोटेरिसिन बी या इंजेक्शनचा वापर केला जातो. 7 हजार रुपये किंमत असलेलं हे इंजेक्शन काळाबाजार करुन महागड्या दरानं विकलं जात असल्याचं बोललं जातं. या इंजेक्शनची गरज बघता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने जेनेटिक लाईफ सायन्सेसने हे एम्फोटेरिसीन बी इंजेक्शन बनविण्यासाठी पाऊल उचलले. यामुळे वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामान्य नागरिकांनाही याचा दिलासा मिळणार आहे.
रेमडेसिवीरचे उत्पादनही केलं जातं
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुडवडा जाणवत होता. रेमडेसिवीर इंजेक्शनची ही टंचाई भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने वर्ध्यातील 'जेनेटेक लाईफ सायन्सेस'ला रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करण्याची परवानगी मिळाली होती. त्यामुळे या कंपनीकडून रेमडेसिवीरचे उत्पादनही केलं जात आहे.
महत्वाच्या बातम्या :