विशेष म्हणजे जानकरांना ब्लॅकमेल करु पाहणारे हे आरोपी आधी त्यांच्याच राष्ट्रीय समाज पक्षात विविध पदांवर काम करत होते. मंत्री महादेव जानकर आणि शेळी - मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोलताडे यांच्यासंदर्भात संभाषणाच्या आक्षेपार्ह व्हिडीओ आणि ऑडीओ क्लिप्स आपल्याकडे असून पैसे न दिल्यास त्या व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी दिली होती.
यानंतर जानकर यांच्याकडून बारामती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला. साडेचार लाख रुपयांच्या खऱ्या नोटा आणि त्याखाली कागदाची बंडलं घेऊन गेले. साध्या वेशातील पोलिसांनी आरोपींना पैसे घेण्यासाठी बारामतीमधील एका हॉटेलमध्ये बोलावलं.
क्लिप व्हायरल न करण्यासाठी 50 कोटींची खंडणीची मागणी आरोपींकडून केली जात होती. तसेच खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिली होती.
अखेर 50 कोटी रुपयांची खंडणीची मागणी तडजोडीनंतर 30 कोटींवर आली होती. या रकमेचा पहिला हप्ता 15 कोटी रुपये देण्याचं ठरलं. त्यानुसार आरोपी पहिल्या टप्प्यातील रक्कम स्वीकारण्यासाठी आले असता पोलिसांनी त्यांना रंगेहात अटक केली. डॉ. इंद्रजीत भिसे, सचिन पडळकर, दत्ता करे, तात्या कांरडे, विकास अलदर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
या ठिकाणी आरोपी पैसे मोजत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली होती. पोलिसांनी या प्रकरणी नऊ जणांना अटक केली असून आणखी चार आरोपी फरार आहेत. गुन्हा नोंद करण्यात सर्व 13 आरोपींविरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे माळशिरस, शिरूर, दौंड अशा वेगवेगळ्या भागातील आहेत.
खुद्द मंत्र्यांना आणि महामंडळाच्या अध्यक्षांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येतं आहे. तर दुसरीकडे घडलेला हा सर्व प्रकार राजकीय व्देषातून झाला असल्याचा दावा आरोपींचे वकिल अक्षय महाडिक यांनी केला आहे.