मुंबई : बीडचं स्वतःचं एक राजकारण आहे. पूर्वीपासून भाजपच्या बाजूने आणि त्यांच्या विरोधातली काही मतं आहेत. धनंजय मुंडेंनी स्वतः काही कमावलेलं नाही. त्यामुळं राष्ट्रवादीच्या मतांचं श्रेय त्यांनी घेऊ नये. जिल्ह्यातील राष्ट्रवादी त्यांनी यशस्वीपणे स्वतःच संपवली आहे, असा टोला महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी लगावला आहे.

समजा मी भाजपला कमी मतदान झालेल्या बूथची यादी मागवली तरी काय फरक पडणार आहे. धनंजय यांच्या बुद्धिमत्तेची जाणीव मला पूर्ण आहे, जगाला नाही. त्यांनी त्याचं प्रदर्शन करू नये, असेही त्या म्हणाल्या. विरोधकांनी जातीचं राजकारण केलं कारण त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच नव्हता, अशी टीकाही त्यांनी केली.

एक्झिट पोलचे आकडे समाधान आणि आनंद देणारे आहेत. आम्ही अंदाज वर्तवले त्याहून चांगले अंदाज देशभरातले दिसत आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत मी एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेमध्ये 36 ते 38 जागा लिहून दिल्या होत्या. त्यावर मी आजही ठाम आहे, असे त्या म्हणाल्या.

प्रीतम मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंचं फक्त पितृत्व पाहिलं पण मी त्यांचं नेतृत्व आणि पितृत्व दोन्ही अनुभवलं. त्यामुळे त्यांच्याशिवाय पहिली सार्वत्रिक निवडणूक लढतांना मी त्यांच्यातला नेता खूप मिस केला, असे मुंडे म्हणाल्या. यावेळेस मुंडे साहेब नसल्याने निर्णय घेण्याची अधिकची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. कोणाला किती जवळ करायचं, कोणाला कसं हाताळायचं, कोणाचे काय सामाजिक परिणाम होऊ शकतात हे या लोकसभा निवडणुकीत शिकायला मिळालं, असं त्या म्हणाल्या.

2014 नंतर बीड जिल्ह्यात पक्षावर नसेल पण मुंडे साहेबांवर प्रेम करणारांनी त्यांना श्रद्धांजली म्हणून मतदान केलं. मात्र यावेळेला प्रीतमचं काम, माझी राजकीय शैली आणि संघर्ष या आधारावर होईल, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

जयदत्त क्षीरसागर यांना राष्ट्रवादीनं जेवढं छळलं तेवढं आम्ही जवळ केलं. विकासाच्या मुद्द्यावर एकत्र काम केलं म्हणून आज ते आमच्या मित्रपक्षात शामिल होत आहेत, असे त्या म्हणाल्या. जिल्ह्यातले अनेक मोठे राष्ट्रवादीचे नेते पक्षापासून दुरावले. त्यामुळे आता पंकजा विरुद्ध धनंजय असा लढा नसून राष्ट्रवादीला अंतर्मुख करणारा हा लढा आहे. धनंजय यांच्या नेतृत्वात त्यांनी जिल्ह्यात पक्ष संपवला. मी स्वतः अनेक मोठ्या नेत्यांच्या संपर्कात आहे. भविष्यात त्यांचा प्रवेश झाला तर स्वागतच. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही पंकजा म्हणाल्या.